
हिऱ्याची खरी पारख एक ‘जोहरी’च करू शकतो असे आपण म्हणतो. अनेकदा आपल्या डोळ्यासमोर एखादी मौल्यवान वस्तू असते, पण आपण त्याचे मौल्य ओळखू शकत नाही. याचाच प्रत्यय रोमानियातील एका खेडेगावामध्ये घडलेल्या घटनेवरून आला आहे. येथे एक वयोवृद्ध महिला गेल्या अनेक दशकांपासून दाराला ‘टेकू’ म्हणून वापरत असलेला दगड दुर्मिळ रत्न निघाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये याची किंमत 1.1 मिलियन अर्थात हिंदुस्थानी रुपयांमध्ये 9 कोटींहून अधिक आहे.
रोमानियाच्या एका खेड्यात राहणाऱ्या वृद्ध महिला गावातील ओढ्यामध्ये एक लाल रंगाचा दगड सापडला होता. या महिलेने साडे तीन किलो वजनाचा हा दगड घरी आणला आणि त्याचा वापर घराच्या दाराला टेकू म्हणून करू लागली. पण ज्या अंबर दगडाला वृद्ध महिला दगड समजत होती त्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे समोर आले आहे. जगातील सर्वात मोठ्या अखंड अंबर तुकड्यांपैकी एक असलेल्या या दगडाची किंमत 9 कोटी 41 लाखांच्या घरात आहे.
विशेष म्हणजे या महिलेलाच नाही तर चोरांनाही या दगडाची किंमत कळली नव्हती. कारण या महिलेच्या घरी एकदा चोरी झाली होती. चोरांनी महिलेच्या घरातील मौल्यवान वस्तू, दागिने यांच्यावर हात साफ केला. मात्र त्यांनाही हा कोट्यवधींचा अंबर ओळखू आला नाही. आता ही महत्त्वपूर्ण माहिती रोमानिया सरकार आणि स्पेनमधील ‘एल पाईस’ नावाच्या एका वृत्तपत्राने समोर आणली आहे.
नेमकं काय घडलं?
रोमानियातील कोल्टी गावामध्ये एक वृद्ध महिला आपल्या कुटुंबासोबत राहत होती. या गावातून वाहणाऱ्या एका ओढ्याजवळ महिलेला अंबर दगडाचा तुकडा सापडला होता. काहीसा लालसर, पिवळसर असलेला हा दगड महिलेने घरात आणला आणि त्याचा वापर ती दाराला टेकू म्हणून करू लागली. 1991 मध्ये या महिलेचे निधन झाले. त्यानंतर घरातील या मौल्यवान दगडावर एका नातेवाईकाची नजर पडली आणि त्याने हा अंबर धातू असल्याचे ओळखले. पुढे या कुटुंबाने हा दगड थेट रोमानिया सरकारला विकून कोट्यवधी रुपये मिळवले.
View this post on Instagram
राष्ट्रीय खजिना घोषित
दरम्यान, रोमानिया सरकारने हा अंबर दगड राष्ट्रीय खजिना म्हणून घोषित केला. तसेच त्याची तपासणी करण्यासाठी पोलंड येथील क्राकोव येथील इतिहास संग्रहालयात पाठवला. संग्रहालयातील तज्ज्ञांनी या तुकड्याचा अभ्यास करून हे अंबर जवळपास 38.5 ते 70 मिलियन वर्ष जुने असल्याचा निष्कर्ष काढला. त्यानंतर रोमानियाच्या सरकारने अंबरचा हा मौल्यवान तुकडा बुजाऊच्या विभागीय संग्रहालयामध्ये ठेवला आहे.