गोव्याच्या नेतृत्वासाठी यशस्वी जैसवालने मुंबई सोडली

ज्या शहराने घडवलं, ओळख दिली त्या मुंबई क्रिकेटला धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैसवाल सोडणार आहे. राष्ट्रीय क्रिकेटमध्ये तळाला असलेल्या गोव्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याचे कारण सांगत जैसवालने मुंबई क्रिकेटपासून आपलं नातं तोडत असल्याचे धक्कादायक पत्र मुंबई क्रिकेट संघटनेला लिहिले. आगामी मोसमात गोव्याकडून खेळण्याची इच्छा व्यक्त करत मुंबई क्रिकेटने आपल्याला बंधनातून मुक्त करण्याची विनंती केली होती आणि एमसीएने त्याची विनंती मान्यही केली.

यशस्वीचा निर्णय अन् एमसीएला आश्चर्याचा धक्का

मुंबई क्रिकेट ही आजही हिंदुस्थानी क्रिकेटची पंढरी आहे. अवघ्या हिंदुस्थानातील क्रिकेटपटू ज्या मुंबईसाठी खेळण्याचे स्वप्न पाहतात त्या मुंबईला सोडण्याचा यशस्वीचा निर्णय खुद्द मुंबई क्रिकेट संघटनेलाही आश्चर्यचकित करणारा वाटला आहे. यशस्वीने हा निर्णय नक्कीच विचारपूर्वक केला असेल. आम्हीही त्याची इच्छा मान्य केली आहे आणि त्याला मुंबई क्रिकेटपासून स्वतंत्र केल्याचे एका एमसीए पदाधिकाऱ्याने सांगितले. यशस्वी गेल्या मोसमात मुंबईसाठी 23 ते 25 जानेवारीदरम्यान आपला अखेरचा सामना खेळला होता आणि जम्मू आणि कश्मीरविरुद्धच्या सामन्यात त्याला 4 आणि 26 धावा करता आल्या होत्या. त्याने मुंबईसाठी सात प्रथम श्रेणी सामन्यांत 52 च्या सरासरीने 491 धावा केल्या आहेत. मुंबईसाठी दमदार खेळून त्याने हिंदुस्थानी संघात स्थान मिळवले होते.

यशस्वीच्या या निर्णयाचे अवघ्या क्रिकेट विश्वातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खुद्द यशस्वीलाही हा निर्णय घेणे कठीण होते. ‘‘मी आज जे काही आहे ते मुंबईमुळे. याच शहराने मला घडवेलय आणि ओळख दिलीय. यासाठी मी मुंबई क्रिकेटचा आयुष्यभर ऋणी राहीन. मला गोवा क्रिकेट संघटनेने नेतृत्वाची सुवर्ण ऑफर दिली. ही माझ्यासाठी खरोखरच एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे मी नेतृत्वाची ऑफर स्वीकारली आहे. पण माझे पहिले ध्येय हिंदुस्थानी संघ असेल आणि मी जेव्हा जेव्हा राष्ट्रीय संघाबरोबर नसेन तेव्हा मी गोव्याचे नेतृत्व करीन आणि गोव्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करीन. ही एक जबरदस्त संधी माझ्यासमोर अचानक आली आणि मी ती स्वीकारल्याचे यशस्वीने सांगितले.’’

मुंबई सोडण्याची जुनी परंपरा

हिंदुस्थानात क्रिकेटची खाण मुंबईत असल्यामुळे इथे दरवर्षी हजारो क्रिकेटपटू घडतात. मुंबईच्या रणजी संघात स्थान मिळवणे राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याइतकेच कठीण असल्यामुळे आजवर अनेक क्रिकेटपटू संधीच्या शोधात शेजारील छोटय़ा-छोटय़ा राज्यांकडून खेळत आले आहेत. मुंबईसाठी यशस्वी ठरलेले मात्र नंतर दुसऱ्या राज्यांसाठी खेळलेल्या क्रिकेटपटूंमध्ये अमोल मुझूमदार, वसीम जाफर, सिद्धेश लाडसारख्या असंख्य खेळाडूंचा समावेश आहे.