
इन्कम टॅक्स विभागाने एप्रिल 2022 मध्ये बजावलेल्या नोटिशीला आव्हान देणाऱया याचिकेवर तातडीच्या सुनावणीची मागणी करणाऱया उद्योगपती अनिल अंबानी यांना हायकोर्टाने 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. हा दंड सुनावताना याचिकेवर तातडीच्या सुनावणीची गरज नसल्याचे न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. दरम्यान ही रक्कम दोन आठवडय़ांत टाटा स्मृती रुग्णालयाकडे सुपूर्द करण्याचे आदेश खंडपीठाने दिले.
अनिल अंबानी यांना इन्कम टॅक्स विभागाने एप्रिल 2022 साली कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटिसीला अंबानी यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी अंबानी यांच्या वतीने हायकोर्टात करण्यात आली. कर विभागाने संबंधित कर निर्धारण वर्षासाठी 27 मार्च रोजी आदेश काढल्याची माहिती अंबानी यांच्या वतीने न्यायालयाला देण्यात आली. तसेच, न्यायालयाने सुनावलेल्या दंडाची रक्कमही भरण्यात आल्याचे आणि याचिका मागे घेण्यास तयार असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने याची दखल घेत सदर याचिका निकाली काढली.