
अमेरिकेचे उद्योगपती आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांची न्यूरालिंक कंपनी अंध व्यक्तीसाठी लवकरच एक ‘ब्लाइंड साइट चिप’ घेऊन येणार आहे. न्यूरालिंक कंपनी 2025 च्या अखेरपर्यंत ही चिप व्यक्तीच्या मेंदूत बसवणार आहे. या चीपमुळे अंध व्यक्तीलासुद्धा स्पष्टपणे दिसण्यास मदत होईल, असा कंपनीने दावा केला आहे. ब्लाइड साईट चिप एक आर्टिफिशियल व्हिज्युअल्स प्रोस्थेसिस आहे. याला थेट मेंदूच्या व्हिज्युअल्स कॉर्टेक्समध्ये बसवले जाईल. ही एक मायक्रो इलेक्ट्रोड चिप आहे. जी पॅमेराने सिग्नलला प्रोसेस करून मेंदूत व्हिज्युअल इमेज बनवते. त्यामुळे ज्या लोकांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तेसुद्धा अवतीभवतीचे जग पाहू शकतील. व्हिज्युअल्स कॉर्टेक्समध्ये इलेक्ट्रोड्सद्वारे न्यूरॉन्सला स्टिम्युलेट करेल. बाहेरील कॅमेराने मिळवलेल्या डेटाला प्रोसेस करून मेंदूत व्हिज्युअल्स इमेज तयार करेल. सध्या ही चिप गाईड डॉग आणि वॉकिंग केनची जागा नसली तरी त्याच्यासोबत मिळून काम करेल, असे इलिनोस इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नोलॉजीचे प्राध्यापक फिलिप ट्रोयक म्हणाले. सुरुवातीला अटारी ग्राफिक्ससारखी लो-रिझॉल्यूशन इमेज दिसेल. परंतु भविष्यात सुपरह्यूमन व्हिजन आणि अल्ट्रा-क्लियर सुपरह्यूमनपर्यंत पोहोचू शकेल, असे एलॉन मस्क यांनी म्हटले आहे.
कधी होईल पहिली चाचणी?
मस्क यांनी घोषणा केल्याप्रमाणे न्यूरालिंक कंपनी 2025 च्या अखेरपर्यंत व्यक्तीमध्ये चिप बसवण्याची योजना करत आहे. याआधी माकडावर याची चाचणी करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. आता माणसावर याची चाचणी केली जाणार आहे. सप्टेंबर 2023 मध्ये अमेरिकेच्या खाद्य आणि औषधी प्रशासनाने याला ब्रेकथ्रो मेडिकल डिव्हाईसचा दर्जा दिला आहे. याआधी न्यूरालिंकने टेलिपॅथी नावाची ब्रेन चिप माणसांमध्ये यशस्वीपणे बसवली आहे. जर ही चिप यशस्वी झाली तर अंध व्यक्ती पहिल्यांदा जग पाहू शकतील.