लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी दिल्लीला रवाना

राष्ट्रीय जनता दल (राजद) सुप्रिमो आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली आहे. रक्तातील साखर वाढल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. पाटण्यातील डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी लालू प्रसाद यादव आता दिल्लीला रवाना झाले आहेत, अशी माहिती मिळत आहे

दरम्यान, लालू प्रसाद यादव गेल्या काही वर्षांपासून गंभीर आरोग्य समस्यांनी ग्रस्त आहेत. मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि इतर आरोग्य कारणांमुळे त्यांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 2022 मध्ये लालूंना किडनीच्या गंभीर समस्येचा सामना करावा लागला. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की, मूत्रपिंडाचा फक्त 25 टक्के भागच काम करत होता. यानंतर त्यांना मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा सल्ला देण्यात आला. त्यांची मुलगी रोहिणी आचार्य हिने त्यांना तिची एक किडनी दान केली. 5 डिसेंबर 2022 रोजी सिंगापूरमध्ये प्रत्यारोपण यशस्वी झाले. लालू यादव यांना हृदयरोगही आहे. 2021 मध्ये रांची येथील बिरसा मुंडा मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्यांना हृदयविकाराचे निदान झाले. डॉक्टरांनी तज्ज्ञांकडून उपचार घेण्याचा सल्ला दिला. यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये मुंबईतील एका रुग्णालयात त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.