एप्रिल फूल… पलावा पुलाचे कुणाल कामराच्या हस्ते उद्घाटन, माजी आमदार राजू पाटील यांनी पुन्हा डिवचले

कल्याण शीळ मार्गावरील पलावा जंक्शन येथे दोन उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र अनेक वर्षे उलटूनही हे काम अर्धवट आहे. प्रचंड वाहतूककोंडीमुळे सर्वांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी मिंधे गटाला पुन्हा एकदा डिवचले आहे. पुलाचे उद्घाटन 31 एप्रिल रोजी स्टँडअप कॉमेडीयन कुणाल कामराच्या हस्ते होणार असे बॅनर राजू पाटील यांनी डोंबिवलीत लावले आहेत. याशिवाय ‘तारखांच्या आश्वासनांनी फुल्ल ! कधी होणार पलावा पूल?… की बनत होता.. बनत आहे.. आणि बनतच राहील पलावा पूल?’ असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक ट्विटच्या माध्यमातनही त्यांनी केला आहे.

कल्याण शीळ रस्त्यावर वाहतूककोंडी होते. मेट्रोचे काम, रस्त्यांची दुर्दशा आणि बेशिस्त वाहनचालक यामुळे या मार्गावरून प्रवास करणे कठीण बनले आहे. विद्यार्थी, नोकरदार आणि अन्य नागरिक यांना याचा मोठा फटका बसतो. अनेक वेळा वाहतूककोंडीमुळे शाळा बंद करण्याची वेळ येते. या समस्येवर तोडगा म्हणून पलावा जंक्शन येथे दोन उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र हे काम गेल्या काही वर्षांपासून रखडले असून त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. या रखडलेल्या कामावर लक्ष वेधण्यासाठी राजू पाटील यांनी 1 एप्रिल रोजी या पुलाच्या समोर एक उपहासात्मक बॅनर लावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना डिवचले आहे.