
>> प्रभाकर पवार
आईसोबत आपल्या आजीच्या घरी आलेल्या एका 4 वर्षांच्या बालकाचा खून त्या मुलाच्याच वडिलांच्या मित्राने केला असल्याची दुर्दैवी घटना गेल्या आठवड्यात कांदिवली (पश्चिम) इराणीवाडी येथे घडली. दि. 22 मार्च रोजी पहाटे पावणेदोनच्या सुमारास अक्षय अशोक गरुड (25) या डिलिव्हरी बॉयने रस्त्यावर आपल्या कुटुंबीयांसह झोपलेल्या अंश या चार वर्षांच्या मुलाला उचलले, अपहरण केले व जवळच नेऊन त्याचा गळा दाबला. मुलगा मृत झाल्याची खात्री पटल्यावर त्याने त्या मुलाला पुन्हा त्याच्या आजीच्या घराजवळ मोटारसायकलवरून आणून टाकले. लहान मुलाच्या या खून प्रकरणात अक्षय गरुड या आपल्याच जवळच्या तरुणाचा सहभाग असल्याची तक्रार अंशच्या आई-वडिलांनी कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र अडाणे यांच्याकडे केल्यानंतर उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे, उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पोलीस पथके तयार करण्यात आली रवींद्र अडाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विभागातील बहुसंख्य ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता अक्षय गरुड हा मुंबई सोडून सुरतला पळाल्याचे उघड झाले. रवींद्र अडाणे यांनी सुरत येथे फिल्डिंग लावून गुन्हा घडल्यानंतर चार दिवसांत अक्षय गरुडला ताब्यात घेतले व मुंबईत आणले. किरकोळ कारणावरून रागाच्या भरात आपण हे कृत्य केल्याची कबुली अक्षयने पोलिसांना दिली. याचदरम्यान नवी मुंबईतील तळोजा येथे आपल्याच शेजारी राहणाऱ्या एका तीन वर्षांच्या मुलीची मोहम्मद अन्सारी या स्लायडिंगचे काम करणाऱ्या शेजाऱ्याने गळा दाबून हत्या केल्याचे व मृतदेह बॅगेत भरून तो आपल्या घरातील बाथरूममध्ये लपविला असल्याचे उघड झाल्यानंतर तळोजा पोलिसांनी मोहम्मद अन्सारीला अटक केली. ही हत्याही शेजाऱ्यांशी झालेल्या वादातून राग आल्याने घडवून आणण्यात आल्याचे उघड झाले आहे
लहान मुले ही देवाघरची फुले आहेत. अशा या निरागस, निष्पाप मुलांचा मेंदूचा विकार झालेला मनुष्यप्राणी कधी बळी घेईल, त्याचे अनन्वित हाल करील याचा नेम नाही. काही जन्मदाते माता-पिताही त्याला अपवाद नाहीत. नवी मुंबईतील कळंबोली येथील एका पाच वर्षांच्या मुलीला मेणबत्तीचे चटके देणाऱ्या तिच्या आईला वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अटक केली. संतापलेले, निराश झालेले बरेच पालक आपला राग आपल्या मुलांवर काढतात. त्यांना इजा करतात. त्यांना सिगारेटचे चटके देतात. दारू, सिगारेट, तंबाखू आणण्यासाठी दुकानात पाठवतात. मुली असतील तर त्यांना (धंद्याला लावण्यासाठी) विकून टाकतात. अशा या विकृतांना आपण आई वडील कसे म्हणू शकतो? मुलगी झाली म्हणून किंवा अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या अर्भकाची विल्हेवाट लावणारे नीच लोक तर आपणास पदोपदी आढळून येतात. आज सर्वात दुर्बल लहान मुले आहेत. जगातील अल्पवयीन मुलांपैकी 60 टक्के लहान मुलांवर परिचितांकडूनच अत्याचार केले जात आहेत. आज आपल्या घरातच लहान मुलं-मुली सुरक्षित नाहीत. बाल अत्याचार वाढत आहेत. त्यांचे लैंगिक शोषण केले जात आहे. एकट्या अमेरिकेतच दरवर्षी दहा लाखांहून अधिक मुलांवर अत्याचार केले जातात. त्यात हजारांच्या वर मुलं मरण पावतात.
उत्तर प्रदेशातील नोएडा येथील 2006 चे निढारी हत्याकांड आठवले तर मन आजही थिजून जाते. लहान मुलं व महिलांवर अत्याचार करून त्यांची प्रेते नाल्यात फेकणाऱ्या एका डॉक्टर व त्याच्या नोकराला अटक करण्यात आली. 20 जणांचे खून करणाऱ्या या दोन नराधमांना फाशी झाली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली. कोल्हापूरच्या सीरियल किलर गावीत भगिनींनी 1990 च्या सुमारास 9 लहान मुलांचे अपहरण करून त्यांच्या हत्या केल्या. त्यांनाही सत्र न्यायालयाकडून फाशी झाली, परंतु उच्च न्यायालयाने या गावीत भगिनींना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मुलांचे अपहरण करून त्यांना भीक मागायला लावणाऱ्या टोळ्या आपण पाहतो. त्यातील बरीच मुलं ही आई-वडिलांच्या त्रासाला, निष्ठुरतेला कंटाळून घरातून पळून जातात व गावीत भगिनींसारख्या टोळ्यांच्या हाती लागतात. या टोळ्या त्यांचा गैरफायदा घेतात. बऱ्याच टोळ्या पोर्नोग्राफीसाठी त्यांचा वापर करतात. या जगात लहान मुलांचे जितके लैंगिक शोषण केले जाते तितके कुणाचेच नाही. असहाय्य बालकं दुष्टांच्या हाती लागल्यावर काय होणार? आपल्या देशात रोज शेकडो मुले हरवत आहेत. त्यांचा शोध लागत नाही म्हणून पोलिसांनी साध्या वेशात रेल्वे, बस स्थानके, उद्याने, फिल्म स्टुडिओ आदी ठिकाणी पाळत ठेवून मुले पळविणाऱ्या टोळ्यांवर कारवाई केली पाहिजे. मुंबई शहरात मुंबई गुन्हे विभागात असलेल्या समाजसेवा शाखेतून (Social Security Branch) हरविलेल्या मुलांचे शोध घेण्याचे काम केले जाते, परंतु ही शाखा लेडीज ऑर्केस्ट्रा, बारवर धाडी घालण्यातच जास्त रस घेते, हरवलेल्या मुलांचा कमी! निराधार बालके त्यांच्या रक्षणासाठी, उदरनिर्वाहासाठी, वाढीसाठी व विकासासाठी प्रौढ समाजावर अवलंबून असतात. परंतु अक्षय गरूडसारखे मत्सरी. क्रोधी अमानुषपणे लहानग्यांचा गळा घोटतात तेव्हा सारी मानवजातच ओशाळून जाते. आज विकृतांपासून लहानग्यांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान आजच्या सुज्ञ, सुसंस्कृत समाजापुढे उभे राहिले आहे.