मुंबई पालिकेची 6 हजार 300 कोटी रुपयांची विक्रमी कर वसुली, 188 कोटी रुपयांची जादा रक्कम जमा 

मुंबई महापालिकेने 2024-25 आर्थिक वर्षात गेल्या 10 वर्षांतला विक्रम मोडत तब्बल 6 हजार 210 कोटी आणि अतिरिक्त दंडापोटी 178 कोटी 39 लाख असा एकूण 6 हजार 388 रुपयांचा मालमत्ता कर करनिर्धारण आणि संकलन विभागाने वसूल केला आहे. पालिकेने या आर्थिक वर्षासाठी 6 हजार 200 कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र मूळ मालमत्ता कर आणि दंडापोटी मिळालेली रक्कम अशी 188 कोटी रुपयांची अधिकची करवसुली केली आहे.

जकात कर बंद झाल्यानंतर महापालिकेची सर्व मदार मालमत्ता करावरच अवलंबून आहे. असे असताना मुंबई महापालिकेने अंदाजे 10 लाख मालमत्ताधारकांकडून आणि छोट्यामोठ्या थकबाकीदारांवर कारवाई करत मालमत्ता कराचे उद्दिष्ट साध्य केले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात तसेच सहआयुक्त विश्वास शंकरवार आणि करनिर्धारक व संकलक गजानन बेल्लाळे यांच्या देखरेखीखाली करनिर्धारण व संकलन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रयत्नांमुळे मालमत्ता कराचे उद्दिष्ट पालिकेने पूर्ण केलेच, पण उद्दिष्टापेक्षा जास्त वसुलीही केली.

जी-दक्षिणमध्ये सर्वाधिक तर ‘बी’मध्ये कमी वसुली

जी दक्षिणमध्ये सर्वाधिक 624 कोटी 50 लाखांच्या मालमत्ता कराची वसुली करण्यात आली. त्या खालोखाल के-पूर्व 568 कोटी 56 लाख, एच पूर्व विभागात 526 कोटी 64 लाख रुपये, के-पश्चिम विभागात 505 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला. तर बी विभागातून सर्वात कमी 36 कोटी 33 लाखांचा मालमत्ता कर वसूल केला.

दंड एक टक्के करण्याचा प्रस्ताव    

मालमत्ता कराच्या दंडापोटी आकारण्यात येणारा दोन टक्के दंड कमी करून तो एक टक्के करण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला आहे. दंड दोन टक्के असल्यामुळे वर्षाला सुमारे 24 टक्के दंड भरणे कठीण जात असल्यामुळे असा प्रस्ताव तयार केला आहे.

800 झोपडीधारकांकडून जमा केला कर 

मुंबई महापालिकेने नुकतीच झोपडपट्टय़ांमधील व्यावसायिकांकडून मालमत्ता कर वसुली सुरू केली असून आतापर्यंत 800 झोपडीधारकांकडून कर जमा करण्यात आला आहे. यापैकी शहर आणि पूर्व उपनगरांमधील झोपडीधारकांकडून कमी कर वसूल करण्यात आला आहे.