
पश्चिम रेल्वेने मागील पाच वर्षांत मुंबई विभागातील 105 लेव्हल क्रॉसिंग बंद करण्यात यश मिळवले. त्यामुळे रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. कामावर जाण्याच्या घाईने रूळ ओलांडण्याचे प्रकार यापूर्वी घडायचे. त्या प्रकारांना रेल्वे प्रशासनाने सुरक्षा उपाययोजनांच्या माध्यमातून चाप लावला आहे.
मुंबई विभागात पाच वर्षांत बंद केलेल्या 105 लेव्हल क्रॉसिंगमध्ये इंटरलॉक केलेले आणि नॉन-इंटरलॉक केलेल्या दोन्ही लेव्हल क्रॉसिंगचा समावेश आहे. यामुळे अपघात कमी होण्याबरोबरच लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्याचा वेग वाढणे, गाड्या वेळेवर पोहोचणे यावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली आहे. लेव्हल क्रॉसिंग बंद केल्याने प्रवाशांच्या सुरक्षेसह वाहतूक व गर्दी नियोजनात हातभार लागत आहे. मुंबई-वडोदरा-दिल्ली या वर्दळीच्या मार्गांवर वंदे भारत, राजधानी, शताब्दी एक्प्रेस धावतात. या ठिकाणी वाहतूककाsंडी लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. तसेच गाड्याचा वेग 160 किमी प्रतितासपर्यंत वाढण्यास मदत झाली आहे, असे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.