अमोघ गावडेच्या नाबाद शतकाने यंग पारसी विजयी

अमोघ गावडेच्या नाबाद 108 धावांच्या झंझावाती खेळीमुळे यंग पारसी क्रिकेट क्लबने मुंबई ज्युनियर शील्ड स्पर्धेत विजय मिळवला.

क्रॉस मैदानावर झालेल्या सामन्यात श्री गुजराती सेवा मंडळाने प्रथम फलंदाजी करताना 36 षटकांत सर्वबाद 159 धावा केल्या. श्री गुजरातीच्या सलामीवीर ऋषी (31), आदित्य कोळी (39 धावा) आणि आसिफ इमानदार यांनी (नाबाद 35)महत्त्वपूर्ण योगदान दिले. गोलंदाजीत अभिनेव पुजारी आणि फैयाज शेख यांनी प्रत्येकी 3 विकेट टिपले.

यंग पारसी क्रिकेट क्लबने 159 धावांचा पाठलाग करताना 39.3 षटकांत हे लक्ष्य यशस्वीपणे पार केले. यामध्ये सलामीवीर अमोघ गावडेच्या अद्वितीय शतकाचा मोठा वाटा होता. अमोघने 122 चेंडूंत नाबाद 108 धावा केल्या, त्यात 8 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. त्याला साहिल सोनीने उत्तम साथ दिली, त्याने नाबाद 39 धावा केल्या. यंग पारसी क्रिकेट क्लबने 6 विकेट राखून सामना जिंकला.