
रोहित शर्मा व विराट कोहली या टीम इंडियाच्या आजी-माजी कर्णधारांसह अष्टपैलू रवींद्र जाडेजा हे खेळाडू ‘बीसीसीआय’च्या नव्या केंद्रीय करारातही ‘ए प्लस’ ग्रेडमध्येच राहणार आहेत. या स्टार खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट स्पर्धेतून निवृत्ती घेतली असली तरी त्यांचा मान कायम ठेवण्यासाठी ‘बीसीसीआय’ त्यांना ‘ए प्लस’ ग्रेडमध्येच कायम ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘बीसीसीआय’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा, विराट कोहली व रवींद्र जाडेजा यांनी टी-20 मधून निवृत्ती घेतल्यानंतरही तिन्ही खेळाडूंना ‘ए प्लस’ ग्रेडमध्ये ठेवण्याचा विचार बोर्ड करत आहे. या श्रेणीत दोन्ही खेळाडूंना वार्षिक सात कोटी रुपये मिळतील. हिंदुस्थानी क्रिकेटसाठी मोठे योगदान असलेल्या या दोन्ही खेळाडूंना त्यांचा योग्य मान मिळाला पाहिजे, अशीच ‘बीसीसीआय’ची भूमिका आहे.
श्रेयस अय्यरचे करारात पुनरागमन होणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाचा मधल्या फळीतील अनुभवी फलंदाज आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर यंदाच्या केंद्रीय करारात परतू शकतो. काही देशांतर्गत सामने न खेळल्यामुळे श्रेयस अय्यरवर केंद्रीय करारातून वगळण्याची कारवाई करण्यात आली होती. अय्यरने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पाच डावांमध्ये 79.41 च्या स्ट्राईक रेटने 243 धावा फटकाविल्या होत्या. या काळात त्याने दोन अर्धशतकेही झळकावली. त्याने अंतिम सामन्यात 62 चेंडूंत 48 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. तो स्पर्धेतील दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्या नव्या केंद्रीय करारात परतण्याचे संकेत मिळाले आहेत.