
मुसळधार पावसात वीज कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. तसेच दरवर्षी वीज कोसळल्यामुळे मोठे नुकसान होते. या नैसर्गिक संकटापासून सुटका करण्यासाठी इस्रोने आणखी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. देशातील कोणत्या भागात कधी वीज कोसळणार आहे, याची माहिती आता अडीच तास आधीच कळणार आहे. वीज कोसळण्याचा अलर्ट देणारी नवी टेक्नोलॉजी इस्रोने विकसित केली आहे. इस्रोने विकसित केलेल्या नव्या सिस्टमअंतर्गत सॅटेलाईट आणि ग्राऊंड आधारित सेन्सरच्या मदतीने वातावरणातील आयनोस्फेरिक बदलाला ट्रक केले जाणार आहे. यानंतर का@म्प्युटर आधारित अल्गोरिदम हा अंदाज लावेल की, कोणत्या भागात वीज कोसळण्याची शक्यता अधिक आहे. हा अलर्ट हवामान विभागामार्फत सर्वसामान्य लोकांपर्यंत दिला जाईल.
देशातील या भागांना फटका
हिंदुस्थानातील उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र यांसारख्या राज्यात दरवर्षी वीज कोसळल्याने मोठे नुकसान होते. परंतु इस्रोच्या या नव्या टेक्नोलॉजीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना आधीच अलर्ट मिळू शकणार आहे. हिंदुस्थानात दरवर्षी अडीच ते तीन हजार लोकांचा मृत्यू हा वीज कोसळल्यामुळे होतो. तसेच अनेक जण जखमी होतात. पिकांचेही मोठे नुकसान होते. परंतु या अलर्टमुळे हे सर्व टाळता येऊ शकते.
– पाऊस सुरू असताना छत्री, मोबाईल टॉवर आणि विजेच्या खांबांपासून दूर राहा.
– वीज चमकणे किंवा आवाज ऐकताच तत्काळ सुरक्षित स्थळी जा.
– उघडे मैदान, शेती, उंच इमारत आणि झाडाखाली बसणे टाळा.
– घरात बसलेले असाल तर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बंद ठेवा. खिडक्यांजवळ उभे राहणे टाळा.