एप्रिलचा निम्मा महिना बँका बंद

एप्रिल महिन्यात वेगवेगळय़ा राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये बँका एकूण 16 दिवस बंद राहणार आहेत. चार रविवार आणि दुसऱ्या तसेच चौथ्या शनिवारव्यतिरिक्त वेगवेगळय़ा ठिकाणी बँका 10 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर या सुट्टय़ा वगळता बँकेत जाता येईल.

पुढील महिन्यात 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, तर 18 एप्रिल रोजी गुडफ्रायडे आहे. बँकांना सुट्टय़ा असल्या तरी ऑनलाइन व्यवहार करता येणार आहेत. ऑनलाइन बँकिंग आणि एटीएमद्वारे पैशांचे व्यवहार करू शकता किंवा इतर कामे ऑनलाइन करता येतील, मात्र बँकांमध्ये जाऊन करावयाची महत्त्वाची कामे मात्र बँकांच्या सुट्टय़ा पाहूनच करावी लागणार आहेत.  6 एप्रिल रोजी रविवारमुळे सर्व ठिकाणी, 10 एप्रिल रोजी महावीर जयंती, 12 एप्रिलला दुसरा शनिवार, 13 एप्रिलला रविवार, 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमुळे सर्व ठिकाणी बँका बंद राहतील. 20 एप्रिलला रविवार, 26 एप्रिल रोजी चौथा शनिवार, तर 27 एप्रिल रोजी रविवार असल्याने सर्व ठिकाणी बँकांना सुट्टी असेल.

11 दिवस शेअर बाजारात व्यवहार नाही

एप्रिल महिन्यात 11 दिवस शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत. शनिवार आणि रविवारी 8 दिवस कोणतेही व्यवहार होणरा नाहीत. याशिवाय 10 एप्रिल रोजी महावीर जयंती, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि 18 एप्रिल रोजी गुड फ्रायडेच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार आहे.