
खोक्याच्या आडून मला संपवण्याचा कट रचण्यात आला असून त्यासाठी लॉरेन्स बिश्नोईला सुपारी देण्यात आल्याचा खळबळजनक आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. खोक्या ऊर्फ सतीश भोसले याच्याशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा करतानाच आमदार धस यांनी यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
खोक्या ऊर्फ सतीश भोसले याचे मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस अडचणीत आले. खोक्या हा आमदार धस यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता असल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र खोक्याचे आणि आपले कोणतेही संबंध नाहीत, असे आमदार धस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले. संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा लावून धरल्यामुळेच आपल्याला संपवण्याचे षड्यंत्र रचण्यात आले आहे. खोक्याचे नाव पुढे करायचे, हरणाचे मांस आणून देत होता असे सांगायचे आणि आपल्याला खलनायक ठरवायचे, असा हा सगळा मामला असून त्यासाठी खास लॉरेन्स बिश्नोई गँगला सुपारी देण्यात आल्याचेही आमदार धस यांनी सांगितले.
माझ्याविरोधात आंदोलन करण्यात आले. खोक्या, हरणाचे मांस हे सगळे मुद्दे राजस्थानात लॉरेन्स बिश्नोई गँगपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यात आले. राजस्थानात बिश्नोई गँगला वक्तव्य करायला लावले. आपल्याला संपवण्यासाठी जे षड्यंत्र रचण्यात आले, त्याची चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही आमदार धस म्हणाले.