देशभरात महामार्ग, एक्स्प्रेस वेवरील प्रवास महागला, 1 एप्रिलपासून टोलदरात 4 ते 5 टक्क्यांनी वाढ लागू

गगनाला भिडलेल्या महागाईपाठोपाठ आता मोदी सरकारने रस्ते प्रवासही आणखी महाग केला आहे. देशभरात महामार्ग आणि एक्सप्रेस वेवरून जलद प्रवास करून इच्छित स्थळ गाठणेदेखील आता महागले आहे. कारण, एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातील टोल दरात 4 ते 5 टक्क्यांची वाढ केली आहे.

वाढलेले टोल दर आजपासून देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलसाठी लागू झाल्याची माहिती रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि एक्प्रेस वेसाठी वेगवेगळे वाढीव दर असणार आहेत. दरवर्षी टोल दरात घाऊक किमतीत महामार्ग निर्देशांक लक्षात घेऊन बदल करण्यात येतात. दरवर्षी 1 एप्रिलपासून हे नवीन टोल दर लागू होतात अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.

समृद्धीवरील टोलदरात 19 टक्क्यांची वाढ

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील प्रवासही मंगळवारपासून महागला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने टोल दरात 19 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे छोटय़ा चारचाकी वाहनांना नागपूर- इगतपुरी प्रवासासाठी 1080 ऐवजी 1290 रुपये मोजावे लागतील. त्याशिवाय राज्यातील सर्वच महामार्गांवर टोलवसुलीसाठी आजपासून फास्टॅग प्रणाली सक्तीची झाली असून हायब्रीड मार्गिका मध्यरात्रीपासून बंद करण्यात आल्या. फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल भरावा लागणार आहे. दरम्यान, शेवटचा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई-नागपूर एकेरी प्रवासासाठी हलक्या चारचाकी वाहनांना 1445 रुपये मोजावे लागणार आहेत.