मस्कच! टेस्ला बनवणार 12 हजार रोबोट, भविष्यात रोबोटच असणार ‘सबकुछ’

अमेरिकेचे उद्योगपती आणि टेस्ला या कंपनीचे सीईओ एलॉन मस्क या वर्षांच्या अखेरपर्यंत जवळपास 10 ते 12 हजार रोबोट बनवणार आहे. मस्क यांनी ऑप्टिमस रोबोट सादर केल्यानंतर ही घोषणा केली आहे. रोबोटचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. भविष्यात सर्वकाही रोबोटवर अवलंबून असणार आहे. यासाठी कंपन्यादेखील यामध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, ऍमेझॉनने ह्युमनॉइड रोबोट निर्माता फिगर एआयमध्ये जवळपास 100 दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक केली आहे. तर मायक्रोसॉफ्ट कंपनी 95 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करत आहे. येणाऱया काळात औद्योगिक नोकऱयांमध्ये 2.5 लाख रोबोट काम करताना दिसतील. 2035 पर्यंत ह्युमनॉइड रोबोट मार्केटची किंमत 38 अब्ज डॉलर असेल. पाच वर्षांत 2.5 लाख ह्युमनॉइड रोबोट औद्योगिक वापरासाठी पाठवले जातील. 2035 पर्यंत, ग्राहकांकडून 10 लाख रोबोट खरेदी केले जातील, असा अंदाज गोल्डमन सॅक्सने वर्तवला आहे.

चीनची कंपनी बनवणार 5 हजार रोबोट

चीनची रोबोटिक्स कंपनी एगिबॉट या वर्षी 5 हजार रोबोट बनवणार आहे. एलॉन मस्क यांच्या पावलावर पाऊल ठेवत चीनची कंपनी रोबोट बनवणार आहे. गेल्या वर्षी याच कंपनीने 1 हजार रोबोट बनवले होते. परंतु आता रोबोटची उत्पादन क्षमता वेगाने करणार असून वर्षभरात पाच हजार रोबोट बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. एगिबॉटचा एक कारखाना शांघायच्या लिंगांग परिसरात आहे. आता कंपनी पुडोंगमध्ये सुद्धा एक कारखाना उघडणार आहे. यामुळे कंपनी दर महिन्याला 400 हून अधिक रोबोट तयार करेल. चीनमध्ये रोबोटचे निर्माणकार्य वेगाने होत आहे. कंपनी तीन प्रकारचे रोबोट तयार करत आहे.