
नागोठणे विभागातील शेतकरी, जेएसडब्ल्यू व्यवस्थापन, पारेषण व प्रशासकीय अधिकाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक होणार आहे. खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत हायटेन्शन लाईनविरोधात चर्चा घडवून आणण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रशासनाला हाताशी धरून बळीराजाच्या शेतीची माती करणाऱ्या जेएसडब्ल्यू व कंत्राटदार कंपनी बीएनसीला चाप बसणार आहे.
नियम धाब्यावर बसवून नागोठणे ते वडखळ यादरम्यान जेएसडब्ल्यूसाठी टाकण्यात येणाऱ्या हायटेन्शन लाईनने शेकडो एकर जमिनीची पुरती वाट लागणार आहे. याविरोधात संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली नागोठणे विभागातील पळस, शेतपळस, बाहेरशीव, वागळी, निडी तसेच मुलावडीतील शेतकऱ्यांनी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. त्यावर तटकरे यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जेएसडब्ल्यू कंपनी, पारेषण व प्रशासकीय अधिकाऱ्यांची आठ दिवसांत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी शेतकऱ्यांनी एकीची वज्रमूठ आवळत हायटेन्शन लाईनविरोधात आरपारची लढाई करण्याचा निर्धार केला.
…तर मंत्रालयावर धडक देऊ
संयुक्त बैठकीत भ्रष्ट अधिकाऱ्यांना उघडे पाडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. यंत्रणांना हाताशी धरून काही निर्णय घेतल्यास थेट मंत्रालयावर धडक देऊन पोलीस व प्रांतांविरोधात उपोषण करण्याचा निर्धारच बळीराजाने केला आहे. यावेळी संघर्ष समितीचे चंद्रकांत दुर्गावले, ज्ञानेश्वर शिर्के, मिलिंद डाकी, रवी शिर्के, भास्कर डाकी, गणपत डाकी, तुकाराम डाकी, रुपेश चंदने, नारायण जोशी, गणेश म्हात्रे, पंढरीनाथ बोरकर, मधुकर मढवी, शशिकांत मढवी, जितेंद्र माळी, मनोहर ताडकर यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.