
वृद्ध महिलेला डिजिटल अटकेची भीती दाखवून तिची फसवणूक केल्याप्रकरणी तोतया पोलीस आणि वकिलाला चारकोप पोलिसांनी अटक केली. भरतराम देवाशी आणि कमलेश चौधरी अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.
तक्रारदार या वृद्ध महिला आहेत. जानेवारी महिन्यात त्या घरी होत्या तेव्हा त्यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला. तुमच्या खात्यात आर्थिक घोटाळ्याचे पैसे जमा झाले आहेत. लवकरच तुमचे खाते बंद होणार असून चौकशीदेखील केली जाणार असल्याची भीती दाखवली. चौकशी होईपर्यंत डिजिटल अटक केल्याची बतावणी केली. चौकशीदरम्यान सहकार्य करण्यास त्यांना सांगितले.
त्या दोघांनी या महिलेला पोलीस आणि वकील असल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान महिलेने तिला बँक खात्याची माहिती देण्यास सांगितले. तसेच तिला पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. भीतीपोटी तिने पैसे ट्रान्स्फर केले. चौकशी केल्यानंतर तिचे पैसे परत केले नव्हते. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच महिलेने चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. तपासादरम्यान पोलिसांना भगतराम आणि कमलेशची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन अटक केली.