
हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवर तस्करांचा कट उधळून लावत बीएसएफ जवानांनी एका तस्कराला अटक केली. यावेळी तस्करी रोखण्याचा प्रयत्न करताना तस्करांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान गंभीर जखमी झाला. 27 मार्च रोजी उत्तर बंगाल फ्रंटियरच्या एका विशेष पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे दार्जिलिंगजवळ ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, दार्जिलिंगजवळ तस्कर आल्याचे समजताच बीएसएफच्या पथकाने तस्करांना पकडण्यासाठी योजना आखली. यावेळी काही तस्कर गुरे घेऊन पळून जाऊ लागले. तेव्हा जवानांनी तस्करांचा पाठलाग करून गुरे पकडली. या झटापटीत एका तस्कराने अचानक बीएसएफ जवानावर गोळी झाडली. यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाला डोक्याला दुखापत झाली. यावेळी उपस्थित असलेले कॉन्स्टेबल ललित राऊत यांनी अथक प्रयत्नांनंतर हल्लेखोराला पकडले.
दरम्यान, मोहम्मद मुझफ्फर हुसेन असे अटक केलेल्या तस्कराचे त्याचे नाव आहे. मोहम्मदला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस, एक कीपॅड मोबाईल आणि चार गुरे जप्त करण्यात आली आहेत. यावेळी चौकशीदरम्यान मोहम्मद हा यापूर्वी सीमेवर तस्करीच्या प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले आहे.