
कर्णकर्कश हॉर्न, प्रचंड वाहतूककोंडी, बांधकाम साईटवरील गोंगाट तसेच मोठ्या आवाजात गाणी वाजवणे या आणि अशा अनेक कारणांमुळे ठाण्याच्या ध्वनिप्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. शहरातील 30 प्रमुख चौकांपैकी 14 स्पॉट धोकादायक ठरविण्यात आले आहेत. आवाजाच्या डेसिबलने अक्षरशः एकाहत्तरी ओलांडली असल्याने ठाणेकरांच्या कानाचे पडदे फाटणार असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या पर्यावरण अहवालात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
ठाणे शहरात दिवसेंदिवस वाढलेल्या लोकसंख्येमुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दीत वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात बोलणे, विनाकारण वाहनांचे हॉर्न वाजविणे, प्रत्येक ५० मीटर अंतरावर सुरू असलेली बांधकामे अशा विविध कारणांमुळे ठाणेकरांच्या अक्षरशः कानठळ्या बसू लागल्याचे अहवालात समोर आले आहे. शांतता क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र आणि निवासी क्षेत्रांमध्येही आवाजाच्या पातळीने उच्चांक गाठला असल्याचे समोर आले आहे.
हे आहेत हॉटस्पॉट
कॅडबरी जंक्शन, नितीन कंपनी, मुलुंड चेकनाका, शास्त्रीनगर नाका, उपवन बस डेपो, गावदेवी नाका, ब्रह्मांड, शिळफाटा, कल्याण फाटा, जांभळी नाका, दिवा डम्पिंग, कळवा भाजी मार्केट, सॅटिस, नौपाडा
ध्वनीची तीव्रता 70 डेसिबलपेक्षा जास्त
ध्वनीची तीव्रता जर 70 डेसिबलपेक्षा जास्त असेल तर मनुष्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र 2022 आणि 2023 या मागील दोन वर्षांच्या तुलनेत 2024 या वर्षात ध्वनीची तीव्रता 60 ते 71.5 डेसिबलपर्यंत पोहोचली असल्याची धक्कादायक बाब अहवालातून समोर आली आहे. दरम्यान, शहरात ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या प्रदूषण विभागाला उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.
या उपाययोजना करण्याचा सल्ला
वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा.
ध्वनी कमीत कमी होईल याची काळजी.
हॉर्नच्या वापरावर नियंत्रण.
ध्वनिरोधक खिडक्या व दरवाजा.
कायद्याची कडक अंमलबजावणी.
कारखान्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
ध्वनिरोधक उपकरणे बसवणे