हत्येच्या प्रयत्नातील ‘तात्या’ सुटताच आधारवाडी जेलबाहेर समर्थकांची हुल्लडबाजी, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीमध्ये असलेला सुजित उर्फ तात्या पाटील हा आरोपी आज जामिनावर सुटला. तुरुंगाच्या परिसरात जमलेल्या त्याच्या शेकडो समर्थकांनी तो बाहेर पडताच तुफान हुल्लडबाजी सुरू केली. अखेर या हुल्लडबाजांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. जेलबाहेर पडलेल्या आरोपी तात्या पाटीलसह 30 जणांना पोलिसांनी पुन्हा ताब्यात घेतले आहे.

भिवंडीत हत्येचा प्रयत्न केला म्हणून सुजित उर्फ तात्या पाटील हा गेल्या काही दिवसांपासून आधारवाडी तुरुंगात होता. त्याची सुटका होणार असल्याचे समजताच भिवंडी व कारागृह परिसरातील असंख्य साथीदार जमले. जेलबाहेर तुफान गर्दी झाली होती. रस्त्यावर तर गाड्याच गाड्या दिसत होत्या. आरोपी सुजित हा जेलबाहेर आल्याचे दिसताच त्याच्या समर्थकांनी प्रचंड आरडाओरडा सुरू केला. अखेर पोलिसांनी धाव घेऊन लाठीचार्ज केला. पोलिसांचा आक्रमक पवित्रा बघून समर्थकांची पळापळ झाली.

मिंधे गटाच्या पदाधिकाऱ्यालाही ‘प्रसाद’

आरोपीच्या स्वागतासाठी जमलेल्या समर्थकांमध्ये मिंधे गटाचे पदाधिकारी महेश पाटील हेदेखील सहभागी झाले होते. मात्र पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये काठ्यांचा चांगलाच ‘प्रसाद’ महेश पाटील यांनाही मिळाला. या घटनेमुळे आधारवाडी जेलबाहेरे तणाव निर्माण झाला होता