
वलसाड जिल्ह्यातील उमरगमध्ये एक धक्कादायक घटना घडली. येते एकाच घरातील चीन जणांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शिवम विश्वकर्मा, त्याची पत्नी आरती देवी आणि त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा अशी या मृतांची ओळख आहे. हे कुटुंब उत्तर प्रदेशातील झासीचे रहिवाशी होते. एक वर्षभरापूर्वीच ते गुजरातमध्ये आले असून भाड्याच्या घरात राहत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी शिवमचा एक मित्र त्यांच्या घरी आला तेव्हा ही घटना उघडकीस आली. वारंवार दार ठोठावल्यानंतरही शिवमने दार उघडले नाही. त्यामुळे मित्राला संशय आला आणि त्याने दरवाजा तोडला तेव्हा शिवम पंख्याला लटकलेला आढळला. तर त्याची बायको आरती आणि त्यांचा मुलगा बेडवर मृतावस्थेत आढळून आले. हे भयंकर दृष्य पाहून शिवमच्या मित्राने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तातडीने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले.
दरम्यान, या कुटुंबाने आर्थिक अडचणींमुळे जीवन संपवल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शिवमने फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठी गुंतवणूक केली होती, जी कथितपणे एक घोटाळा असल्याचे निष्पन्न झाले. या गुंतवणूकीमुळे त्याचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे नैराश्यात येऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.