
महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सद्गुरू बाळूमामा भंडारा उत्सवातील महाप्रसादासाठी मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी व बाळूमामांचा रथ धार्मिक व भक्तिपूर्ण वातावरणात जल्लोषी मिरवणुकीने विधीपूर्वक आदमापूरकडे नेण्यात आला. यावेळी विविध प्रकारच्या वाद्यांमुळे सारे वातावरण उल्हासित झाले होते. याबरोबरच प्रवचन, कीर्तन आणि टाळ-मृदंगांच्या गजराने सारे जण भक्तिरसात न्हाऊन गेले होते.
‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं…’ च्या गजरात आणि भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाराष्ट्र व कर्नाटकातील १९ बग्गीतून आणलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी निढोरीच्या हनुमान मंदिरात आणण्यात आल्या. येथे घागरींचे स्वागत व पूजन झाल्यावर विधीपूर्वक आदमापूरकडे नेण्यात आल्या.
भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर निढोरीतून महाप्रसादासाठी न्यायचे. त्यामुळे या दुधाच्या घागरी निढोरीतून घेऊन जाण्याची प्रथा रूढ झाली आहे.
बाळूमामांनी स्वतः जतन केलेल्या बकऱ्या १९ ठिकाणच्या बग्गी (दीड ते दोन हजार बकऱ्यांचा एक कळप) मध्ये असतात. प्रथेप्रमाणे भंडारा उत्सवानिमित्ताने होणाऱ्या महाप्रसादासाठी आदल्या दिवशी सर्व बग्गीच्या घागरी कागल तालुक्यातील निढोरी येथे एकत्र केल्या जातात. वाजत गाजत आलेल्या प्रत्येक बग्गीतील घागरीचे भाविक, ग्रामस्थांसह महिलांनी औक्षण करून स्वागत केले.
आदमापुरातून आलेल्या बाळूमामा देवस्थानच्या रथाचे निढोरीमध्ये दुपारी आगमन झाले. बाळूमामा देवस्थान समितीचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी रथाचे पूजन केले. बग्गीतील दुधाच्या घागरी मानाच्या बैलगाडी व रथातून दुपारनंतर आदमापूरकडे मार्गस्थ झाल्या.
गुरुवारी द्वादशी दिवशी सकाळी या घागरीतील दुधाने बाळूमामांना अभिषेक घालण्यात आला. उर्वरित घागरीतील मेंढ्यांचे दूध महाप्रसादामध्ये वापरले. उत्साही भक्तांनी जेसीबीतून भंडाऱ्याची उधळण केली. निढोरी ग्रामस्थांनी एकत्र येत रथ मार्गावर आकर्षक रांगोळी आणि रंगीबेरंगी फुलांची पखरण करत कीर्तन, प्रवचन अन् टाळ-मृदंगांबरोबरच ढोल-ताशा गजर तसेच डॉल्बीच्या दणदणाटात भंडाऱ्याची मुक्त उधळण करत ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं…’ चा एकच जयघोष केला.
येथील बाळूमामा भक्त सेवकांमार्फत सर्व भक्तांना मोफत खिचडी, फळे, ताक, कोकम सरबत पुरवण्यात आले. पोलीस प्रशासनाने वाहतूक व्यवस्था व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चोख व्यवस्था केली होती.