…तर आपण 3 ते 6 महिन्यात उद्ध्वस्त होऊ, अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावरून पी. चिदंबरम यांचा मोदी सरकारला इशारा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावरून केंद्रातील मोदी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. अमेरिकेसोबत ‘टॅरिफ वॉर’ सुरू झाल्यास हिंदुस्थानच्या निर्यातीत घट होईल आणि महागाई वाढेल, तसेच जगभरामध्ये व्यापार युद्ध सुरू होऊ शकते, असा इशारा चिदंबरम यांनी दिला. ही परिस्थिती टाळण्यासाठी हिंदुस्थानची काय भूमिका आहे आणि अद्याप सरकारने आपले पत्ते ओपन का केले नाहीत? असा सवालही चिदंबरम यांनी केला. ते राज्यसभेमध्ये बोलत होते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरच्या धमकीला हिंदुस्थानने काय प्रतिसाद दिला आहे, हे स्पष्ट करण्याची मागणीही चिदंबरम यांनी केली. तसेच या विषयावर संसदेमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही किंवा विरोधी पक्षासोबत सरकारने सल्लामसलतही केलेली नाही, असा आरोपही त्यांनी केला. यासह ट्रम्प यांनी सुरू केलेल्या ‘टॅरिफ वॉर’विरुद्ध प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यासाठी समान हितसंबंध असलेल्या इतर देशांचा आधार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

केंद्र सरकारचा असा समज असेल की अमेरिका एक पाऊल पुढे आणि दोन पावले मागे टाकत असेल तर अशा अनिश्चित परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपल्याकडे निश्चित धोरण असायला हवे. अमेरिकेने एक पाऊल पुढे टाकले तर त्यावर आपली प्रतिक्रिया काय असेल? अमेरिकेने दोन पावलं मागे घेतली तर त्यावर आपली प्रतिक्रिया काय असेल? ही प्रतिक्रिया जगासमोर जाहीर करण्याची गजर नाही, पण यावर किमान संसदेत निवेदन द्यावे किंवा विरोधी पक्षांशी सल्लामसलत करावी. टॅरिफ वॉर बाबत हिंदुस्थानचे धोरण काय याबाबत विरोधी पक्ष पूर्णपणे अंधारात आहे आणि बहुतेक मंत्र्यांनाही याबाबत निश्चित माहिती नाही, असे चिदंबरम म्हणाले.

…तर आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल

हिंदुस्थान एक प्रमुख कृषी निर्यातदार देश आहे. आपण कापडही मोठ्या प्रमाणात निर्णयात करतो. तसेच औद्योगित वस्तुंचीही निर्यात करतो. त्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये कृषी, कापड आणि औद्योगिक वस्तुंची निर्यात करणाऱ्या देशांसोबत आपण एकत्र काम केले पाहिजे आणि समान दृष्टिकोन विकसित केला पाहिजे. डोनाल्ड ट्रम्प हे एका वेळी एकच देश निवडत असतील आणि त्यावर शुल्क लादत असतील तर त्या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल. त्यांनी इतर देशांना सोडून हिंदुस्थानची निवड केली आणि हिंदुस्थानमधून निर्यात होणाऱ्या वस्तुंवर टॅरिफ लावला तर आपण उद्ध्वस्त होऊ. तीन ते सहा महिन्यात आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, असा इशारा चिदंबरम यांनी दिला.

विदेशातून आयात होणाऱ्या कारवर 25 टक्के टॅरिफ

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी विदेशातून आयात होणाऱ्या सर्व कारवर 25 टक्के कर लादणअयाची घोषणा केली. हिंदुस्थान अमेरिकेला मोठ्या प्रमाणात कार निर्णयात करत नसला तरी टाटा मोटर्सच्या लक्झरी कार अमेरिकन मार्केटमध्ये विकल्या जातात. ट्रम्प यांच्या धोरणामुळे या कंपनीला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.