छातीला बंदूक लावून शेतगड्याला पळविले, गुन्हा दाखल होताच आरोपी अटकेत

सातारा परिसरात एका डॉक्टरच्या शेतवस्तीवर शेतगडी म्हणून काम करणाऱ्याच्या छातीला बंदूक लावत वस्तीवर हाकलून दिल्याचा प्रकार बुधवारी दुपारी सव्वाअकरा वाजता घडली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा ते पंधराजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सातारा परिसरातील गट नंबर २० मध्ये डॉ. राजीव यादवराव खेडकर यांची २२ एकर शेतजमीन आहे. या शेतीची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम पवन दिलीप सोनवणे (३२, रा. कोटला कॉलनी) हा पाहतो. त्यासाठी त्याला एक स्वतंत्र रूम बांधून देण्यात आली आहे. या शेतात माझी जमीन असल्याचा दावा गेल्या अनेक दिवसांपासून जावेद नूरखान पठाण हा करत होता. त्यामुळे डॉ. खेडकर यांनी भूमी अभिलेखाकडून जमिनीची मोजणी करून घेऊन कायमस्वरूपी खुणा करून तार कंम्पाऊंड करून घेतले आहे. मात्र, तरीदेखील ते त्याला मान्य नाही. त्यामुळे तो सतत वाद घालत असतो.

दरम्यान, शेतजमीन शेतगडी सोनवणे हा दहा ते बारा दिवसांपासून बाहेरगावी गेला होता. तो बुधवारी परत असल्यानंतर शेतवस्तीवर गेला असता तेथे दहा ते पंधरा जण उभे होते. त्यापैकी अब्दुल जावेद वाहेत शेख ऊर्फ जावेद पहेलवान याने सोनवणे याच्या खांद्यावर तलवार ठेवत शेतातून बाहेर जाण्यास सांगितले. तसेच रुमखाली करून त्यातील साहित्य काढून घे, असा दम भरला. ही जमीन अशोक लोढा यांना विक्री केली असून, आताच्या आता साहित्य काढून घे, असे सांगितले. त्यावर सोनवणे याने मालकाला विचारतो, असे म्हणत खिशातून मोबाईल काढताच त्यांनी शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. त्यानंतर जावेद पहेलवानच्या साथीदाराने खिशातून बंदूक काढून सोनवणे याच्या छातीवर रोखली. आत्ताच्या आता निघून जा अन्यथा चाळीसगावला जाऊन विचार जावेद पठाण काय आहे. तू व तुझा मालक पुन्हा येऊ नका असा दम भरला. याप्रकरणी पवन सोनवणे याने दिलेल्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप बचाटे करीत आहेत.