
महाराष्ट्राच्या जिगरबाज पॅरा खेळाडूंनी ‘खेलो इंडिया’ स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी टेबल टेनिसमध्ये पदकांचा षटकार झळकावला. स्पर्धेत 18 सुवर्णांसह 43 पदकांची लयलूट करीत महाराष्ट्राने पदकतक्यात पाचवे स्थान पटकावले. कोल्हापूरच्या दत्तप्रसाद चौगुले व विश्व तांबे यांनी सुवर्णपदकाला गवसणी देत राज्यासाठी स्पर्धेत ‘सुवर्ण’ सांगता केली.
इंदिरा गांधी क्रीडा संकुलात संपलेल्या टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या पॅरा क्रीडापटूंनी 3 सुवर्ण, 3 कांस्यपदकांची कमाई केली. मुंबईच्या रिशित नथवानी, कोल्हापूरचे दत्तप्रसाद चौगुले व विश्व तांबेने सुवर्णपदक जिंकले. विवेक मोरे, वैष्णवी सुतार व पृथ्वी बर्वे यांनी कांस्यपदकांची कमाई केली. दत्तप्रसाद, विश्वने सलग दुसऱ्यांदा सोनेरी यशाचा पल्ला पार केला. टेबल टेनिसमध्ये सर्वसाधारण विजेतेपदाचा मानही महाराष्ट्राने पटकविला.
अपेक्षेप्रमाणे टेबल टेनिस प्रकारात महाराष्ट्राच्या क्रीडपटूंनी सोने लुटले. मुंबईच्या रिशित नथवानीने पुरुषांच्या सी 5 प्रकारात संयमी खेळाचे प्रदर्शन घडवित अंतिम फेरीत उत्तर प्रदेशच्या अभिषेक कुमार सिंगला 3-0 (11-7, 11-6, 11-6) असे एकतर्फी पराभूत केले. रिशितचे खेलो इंडिया स्पर्धेत प्रथमच सुवर्ण पदक जिंकले आहे.
कोल्हापूरच्या शेतकरी कुटुंबातील दत्तप्रसाद चौगुलेने सी 9 प्रकारात हरियाणाच्या रवींद्र यादवला 3-0 गेमने पराभूत करून आपली हुकूमत गाजवली. त्याने 11-4, 11-5, 11-5 गुणांनी नमवित सलग दुसऱ्या वर्षी खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाचा पराक्रम केला.
कोल्हापूरचा हरहुन्नरी खेळाडू विश्व तांबे याने महाराष्ट्रासाठी सुवर्णपदकाची सांगता केली. पुरुषांच्या सी 10 प्रकारात हरियाणाच्या जगन्नाथ मुखर्जीला विश्वने 11-9, 11-8, 11-4 गुणांनी नमवले. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विश्व स्पर्धेत आपले वर्चस्व पहिल्या लढतीपासून प्रस्थापित केले होते.
महाराष्ट्राची गतवेळीपेक्षा सरस कामगिरी
दिल्लीतील ‘पॅरा खेलो इंडिया’च्या दुसऱ्या पर्वात महाराष्ट्राने गतवर्षापेक्षा सरस कामगिरी केली. यंदा 18 सुवर्ण, 13 रौप्य व 12 कांस्य अशी एकूण 43 पदके महाराष्ट्राच्या नावापुढे झळकली. गतस्पर्धेत 12 सुवर्णांसह 35 पदके महाराष्ट्राने जिंकली होती. यंदा अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक 23, बॅडमिंटनमध्ये 4, नेमबाजीत 3, अर्चरीत 2, पॉवरलिफ्टिंगमध्ये 5, टेबल टेनिसमध्ये 6 अशा एकूण 43 पदकांची लयलूट केली आहे. हरियाणाने 104 पदके जिंकून सर्वसाधारण विजेतेपदाचा मान संपादन केला.