
स्वच्छ सर्वेक्षणात देशात तिसरा आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या नवी मुंबई महापालिकेत 620 पदांची मेगा भरती करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उद्यापासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून ती येत्या 11 मेपर्यंत चालणार आहे. भरती प्रक्रियेमध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा, वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय आदी विभागातील गट क आणि ड संवर्गातील पदांचा समावेश आहे. दरम्यान, मराठी तरुणांना या भरती प्रक्रियेकडे लक्ष द्या, असे आवाहन सामाजिक संस्थांनी केले आहे.
नवी मुंबई महापालिकेची स्थापना 1 जानेवारी 1992 रोजी झाली आहे. त्यामुळे गेल्या पाच ते सहा वर्षांपासून पालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या रिक्त होणाऱ्या पदांची उणीव भरून काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे 620 पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहेत. ही नोंदणी उद्यापासून सुरू होणार असून ती येत्या 11 मेपर्यंत रात्री 11.55 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे.
अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या सात दिवस अगोदर परीक्षार्थीना ऑनलाइन प्रवेश पत्र पाठवले जाणार आहे. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाकरिता एक हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
ही आहेत पदे
बायोमेडिकल इंजिनीयर (1), कनिष्ठ अभियंता – स्थापत्य (35), कनिष्ठ अभियंता-बायोमेडिकल इंजिनीयर (6), उद्यान अधीक्षक (1), सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी (1), वैद्यकीय समाजसेवक (15), डेंटल आयजेनिस्ट (3), स्टाफ नर्स (131), डायलेसिस तंत्रज्ञ (3), ईसीजी तंत्रज्ञ (8), सीएसएसडी तंत्रज्ञ (5), आहार तंत्रज्ञ (1), नेत्रचिकित्सा सहाय्यक (1), औषध निर्माण अधिकारी (12), आरोग्य सहाय्यक महिला (12), बायोमेडिकल इंजिनीयर सहाय्यक (6), पशुधन पर्यवेक्षक (2), ऑक्झिलरी नर्स मिडवाइझ (38), बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप (51), शस्त्रक्रिया गृहसहाय्यक (15), सहाय्यक ग्रंथपाल (8), वायरमन (2). ध्वनीचालक (1), उद्यान सहाय्यक (4), लिपिक टंकलेखक (135), लेखा लिपिक (58), शवविच्छेदन मदतनीस (4), कक्षसेविका (38), कक्ष सेवक (29).