
संपूर्ण राज्यातल्या धरणांतील पाण्याचे आणि जलसिंचन विभागाचे मंत्रालयातून नियोजन होते. पण याच मंत्रालयात पाणीबाणी निर्माण झाली आहे. मागील दोन दिवसांपासून मंत्रालयातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सध्याच्या दिवसात कर्मचाऱयांच्या घशाला कोरड पडली आहे.
मंत्रालयातील विविध विभागांत हजारो कर्मचारी काम करतात तर दररोज राज्याच्या कानाकोपऱयातून शेकडो व्हिजिटर्स वेगवेगळ्या कामांसाठी येतात. त्यामुळे मंत्रालयातील लिफ्ट, पाणीपुरवठा, कॅण्टीन व इतर प्रशासकीय यंत्रणांवर कमालीचा ताण पडतो. मागील दोन दिवसांपासून मंत्रालयातील पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मागील तीन आठवडय़ांपासून विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते. पण बुधवारी अधिवेशन संपले. गुरुवारी पुन्हा मंत्रालयात वर्दळ सुरू झाली आहे. त्यातच पाणी गायब झाले आहे.
n दुपारी मंत्रालयाच्या कॅण्टीनमध्ये जेवल्यानंतर हात धुण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे जेवणाचे डबे धुण्यासाठी पाणीच नव्हते. कॅण्टीनमधील कर्मचारी मोठ्या टोपात भरून पाणी घेऊन येत होते. मंत्रालयातील सात मजल्यांवरील शौचालयांतही पाणी नव्हते. फिल्टरचेही पाणी गायब झाले होते. पाणी का गायब आहे, याचे कोणतेही कारण प्रशासनाने अधिकृतपणे दिले नाही.