
हस्तकला प्रशिक्षकांची 5857 पदे खासगी कंपनीमार्फत भरण्याचा कौशल्य विकास विभागाचा जीआर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाने (मॅट) रद्द केला. सलग पाच वर्षे ताशी वेतनावर काम करणाऱया प्रशिक्षकांची सेवा कायम करण्याचे आदेशही मॅटने राज्य शासनाला दिले आहेत.
मॅटच्या अध्यक्षा मृदुला भाटकर व सदस्य ए. एम. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. निलंबत केलेल्या हस्तकला प्रशिक्षकांना सेवेत पुन्हा घ्या. मंजूर पदे रीतसर भरती प्रक्रियेने भरली जात नाहीत तोपर्यंत या प्रशिक्षकांची सेवा खंडित करू नका, असेही मॅटने शासनाला सांगितले आहे.
237 जणांची याचिका
237 हस्तकला प्रशिक्षकांनी ही याचिका केली होती. हे सर्व प्रशिक्षक ताशी वेतनावर गेली अनेक वर्षे काम करत आहेत.