
ओदिशामध्ये 14 आमदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. संतप्त कार्यकर्ते विधानसभेला घेराव घालण्यासाठी जात असताना काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये अक्षरशः धुमश्चक्री उडाली. यावेळी पोलिसांशी झटापटही झाली. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार, पाण्याच्या तोफांचा मारा केला. यात अनेक कार्यकर्ते रक्तबंबाळ झाले. लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना ओदिशा सरकारने केलेल्या कारवाईचा देशभरातून निषेध होत आहे.
25 मार्च रोजी 12 काँग्रेस आमदारांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर आणखी दोन आमदारांना निलंबित केले. त्यामुळे आमदारांनी निषेध सुरूच ठेवला. त्यांनी संपूर्ण रात्र सभागृहात घालवली. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर निदर्शने सुरूच ठेवली. तर दुसऱ्या दिवशी 26 मार्च रोजीही काँग्रेस कार्यकर्ते आणि निलंबित आमदारांनी विधानसभेबाहेर निदर्शने सुरूच ठेवली. सर्व कार्यकर्ते विधानसभेला घेराव घालण्यासाठी निघाल्यावर पोलिसांनी त्यांना रोखले आणि लाठीमार सुरू केला.
बेशिस्तीचे कारण देत निलंबन
भाजप सरकारच्या आठ महिन्यांच्या कार्यकाळात महिलांवरील गुह्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी काँग्रेस आमदारांनी केली होती. त्यासाठी त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच सरकारचा विरोध दर्शवणारे फलक घेऊन आमदार विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत उतरले आणि जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी बेशिस्तपणा आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत आमदारांना निलंबित केले.