
अपहरण करणारी टोळी आल्याचे समजून सीबीआय पथकावर स्थानिकांनी हल्ला केल्याची घटना झारखंडच्या बोकारो जिह्यातील सेक्टर-8च्या काली बाडी येथे घडली. या हल्ल्यात पथकातील तीन अधिकारी जखमी झाले. वाहन रिकव्हरी प्रकरणात लाच मागितल्याच्या आरोपाखाली एजंटला अटक करण्यासाठी हे पथक आले होते.
एएसआय दिनेश्वर पाल, सपन दुबे आणि विपीन प्रमाणिक अशी या सीबीआय अधिकाऱयांची नावे असून तिघांवर बोकारोच्या सरकारी रुग्णालयात उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. धनराज कुमार चौधरी नावाच्या वाहन रिकव्हरी एजंटने 15 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार आल्यानंतर मोबाईल लोकेशन ट्रेस करून सीबीआयचे 8 जणांचे पथक वाहन रिकव्हरी एजंटला अटक करण्यासाठी पोहोचले. धनराजला अटक करून नेताना अचानक स्थानिकांनी पथकावर हल्ला केला.
नेमके काय प्रकरण…
गावातील एका व्यक्तीने कर्ज काढून ट्रक्टर खरेदी केला होता. कर्जाचे दोन हफ्ते फेडले नाहीत म्हणून त्याचा ट्रक्टर बँकेने ओढून नेला होता. त्यानंतर संबंधित व्यक्तीने सर्व हप्ते फेडले आणि ट्रक्टर ताब्यात घेण्यासाठी धनराजकडे गेला. त्या वेळी धनराजने त्याच्याकडे 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.