ताडदेव येथे 51 फुटाची भव्य गुढी

प्रतिकात्मक छायाचित्र

शिवसेना, युवासेना आणि जय भवानी प्रतिष्ठान यांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त रविवारी सकाळी 8 वाजता हिंदू नववर्ष स्वागत वैभव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नाना चौकातील नाना शंकरशेठ महादेव मंदिर येथून या यात्रेला सुरुवात होईल. यंदाचा हा सोहळा मराठी मायबोलीला समर्पित असणार आहे. यंदाच्या शोभायात्रेचे खास आकर्षण म्हणजे 51 फुटाची भव्य गुढी उभारण्यात येणार आहे.

शोभायात्रेत कोकणातील प्रसिद्ध रोंबाट ही लोककलादेखील सादर केली जाणार आहे. छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा, अष्टप्रधान मंडळ हे शोभायात्रेच्या अग्रस्थानी असेल. याशिवाय प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि हनुमान यांचाही चित्ररथ असणार आहे. कोल्हापूरचे दांडपट्टा पथक, नाशिकचे आदिवासी नृत्य, सातारी लेझीम कवायती, महाराष्ट्राची नमन ही लोककला सादर केली जाणार आहे. कोल्हापूरचे शेकडो तरुण हलगी, डफ आणि ताशांच्या तालावर सामील होतील.

मुंबईकरांनी या शोभायात्रेत मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक शिवसेना उपनेते व सिंधुदुर्ग- कोल्हापूर जिह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आणि माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर यांनी केले आहे.