गिरगावात हिंदू नववर्ष स्वागत सोहळा, बाईक रॅली, भव्य चित्ररथ, सेलिब्रेटींची मांदियाळी; शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12तर्फे आयोजन

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12च्यावतीने शिवसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या सोहळ्याची संकल्पना ‘माय मराठी’ अशी आहे. गुढीपाडव्याला म्हणजेच रविवारी सकाळी गिरगाव नाका येथे गुढीचे पूजन करून स्वागत यात्रा सुरू होईल. गिरगावातील महिला बाईकस्वार पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 22 फुटांची भव्य मूर्ती तसेच गिरगावच्या महाराजांची सुबक मूर्ती या स्वागत सोहळ्याचे खास आकर्षण आहे. या यात्रेस प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनेच्यावतीने आयोजित या हिंदू नववर्ष स्वागत सोहळ्यात ‘माय मराठी’ हा विषय घेण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा चित्ररथ, मुंबईमध्ये मराठी माणूस आणि मराठी भाषा टिकली पाहिजे, मुंबईत मराठी माणसाची होणारी गळचेपी, मराठी माणसा एक हो… संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी परत एकदा सज्ज हो, मराठी मुलांना नोकऱयांमध्ये आरक्षण, रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे नाव मुंबई रेल्वे स्टेशन स्थानकाला द्यावे, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरी पुतळा कधी बसवणार आणि अरबी समुद्रात शिवरायांचा पुतळा कधी उभारणार, अशा विविध विषयांवर आधारित चित्ररथ या स्वागत सोहळ्यात असणार आहेत. महेश मांजरेकर, प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौगुले, ईशा डे अशा अनेक सेलिब्रेटींची या सोहळ्यात मांदियाळी असणार आहे.

हिंदू नववर्ष स्वागत सोहळ्यात सर्वांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे, विभाग संघटक युगंधरा साळेकर यांनी केले आहे. या यात्रेस शिवसेना नेते – खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव – खासदार अनिल देसाई, उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, अरुण दुधवडकर यांच्यासह मुंबईतील नेते, पदाधिकारी गिरगावकर सहभागी होणार आहेत.

संविधान वाचवा, देश वाचवा

संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ असा संदेश देणारा चित्ररथ त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय देखावासुद्धा सोहळ्यात असणार आहे. वासुदेव, देवीचा गोंधळ, कुलाबा विधानसभेतील महिलांचे ध्वजपथक, मलबार हिल विधानसभेतील महिलांचे लेझीम पथक, मुंबादेवी महिला आघाडीचे नृत्य सादरीकरण, दानपट्टा, लेझीम हेदेखील सोहळ्याचे आकर्षण असणार आहे. जगदंबा ढोल पथक, संस्कृती ढोल पथक, सुप्रसिद्ध इब्राहिम कच्छीवाला हेदेखील सादरीकरण करणार आहेत.