अ‍ॅमेझॉनच्या गोदामात सापडली नकली उत्पादने

देशातील सर्वोच्च उत्पादन प्रमाणन एजन्सी असलेल्या द ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने (बीआयएस) दिल्लीत अॅमेझॉनसारख्या काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपन्यांच्या गोदामांवर धाडी टाकल्या. या धाडीत बीएसआय प्रमाणपत्रं नसलेली सुमारे साडेतीन हजारांहून अधिक उत्पादने  जप्त करण्यात आली. तब्बल 70 लाख रुपये किमतीची ही उत्पादने आहेत. उत्पादनांच्या दर्जासंदर्भातील नियमांचे पालन व्हावे आणि ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सध्याची मोहीम राबवली जात असल्याचे बीआयएसने सांगितले. आठवडय़ाच्या सुरुवातीला अॅमेझॉनच्या मोहन को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल एरियातील गोदामांवर शोध आणि जप्तीची मोहीम राबवण्यात आली. 15 तास हे ऑपरेशन चालले आणि त्यात  आयएसआय लेबल नसलेली आणि नकली आयएसआय लेबल लावलेली साडेतीन हजार उत्पादने जप्त करण्यात आल्याचे बीआयएसने निवेदनाद्वारे सांगितले. या उत्पादनांमध्ये गिझर, फूड मिक्सर आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे.