जन्मापासून मृत्यूपर्यंत टॅक्सच टॅक्स, राज्यसभेत खासदार राघव चढ्ढा मोदी सरकारवर बरसले

आम आदमी पक्षाचे (आप) खासदार राघव चढ्ढा यांनी गुरुवारी राज्यसभेत देशाच्या कर व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. राघव चढ्ढा म्हणाले की, जन्मापासून मृत्यूपर्यंत, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सरकार नागरिकांना मदत करण्याऐवजी त्यांच्यावर कर लादते. नागरिकांना करांच्या बदल्यात जागतिक दर्जाचे आरोग्य, शिक्षण किंवा पायाभूत सुविधा मिळतात का? असा प्रश्नही चढ्ढा यांनी विचारला.

राज्यसभेत आपल्या भाषणात राघव चढ्ढा म्हणाले की, “आयुष्यात दोन गोष्टी निश्चित आहेत, मृत्यू आणि कर. बाळाचा जन्म होताच त्याला दिलेल्या लसीवर 5 टक्के जीएसटी आकारला जातो. जर रुग्णालयाच्या खोलीची किंमत 5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावरही 5 टक्के जीएसटी भरावा लागतो. बाळांच्या काळजीच्या उत्पादनांवर आणि मिठाईवरही 5 टक्के जीएसटी लागू आहे.” चढ्ढा म्हणाले म्हणाले की, ते विश्वगुरू बनण्यासाठी आले होते पण शेवटी ते टॅक्सगुरू बनले. जनता सरकारला इतका कर देते पण त्या कराच्या बदल्यात त्यांना काय मिळते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.