
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारचे काही प्रतिनिधी घुसले आणि त्यांनी धनंजय मुंडेंना वाचवलं. त्यांनी हे पाप डोक्यावर घेतलं आहे. याचा परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावं लागेल, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील असं म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक सरकारने वाचवलं आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना वाचवलं नाही पाहिजे. कारण त्यांनी इतकी क्रूर हत्या घडवून आणली की, अशी क्रूर हत्या या राज्यात कोणीच केली नव्हती. म्हणून त्यांना पाठीशी घालू नका. धनंजय मुंडेंना पैसे पाहिजे होते, त्यांच्याच कार्यलयात ही बैठक झाली होती. त्यानंतर खंडणी, अपहरण आणि नंतर खून हे धनंजय मुंडे यांनी घडवून आणलं. म्हणूनच 302 मध्ये धनंजय मुंडे यांना 100 टक्के आरोपी केलं पाहिजे, हे गृहमंत्री फडणवीस यांनी करायला हवं.”
ते म्हणाले, “आरोपींनी कबुली दिली आहे की, अपहरण आणि खून आम्ही केलं. त्यांनी हेही सांगितलं असावं की, धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून आम्ही हे केलं आहे. कारण धनंजय मुंडे यांचेच कार्यकर्ते आहेत ते, त्यांनाच पैसे देत होते. रोज त्यांच्यासोबत राहत होते. त्यांनी यांना पाठबळ दिल्याशिवाय यांच्यात असं कृत्य करण्याची धमक नाही. सरकारी प्रतिनिधी या आंदोलनात घुसले आणि त्यांनी धनंजय मुंडेंना वाचवलं. त्यांनी हे डोक्यावर पाप घेतलं आहे. याचा परिणाम आणि फळ त्यांनाही भोगावं लागेल.”