पायाला प्लास्टर, हताश नजर; RR च्या सलग दुसऱ्या पराभवानंतर द्रविडचा व्हिलचेअरवरील फोटो व्हायरल, नेटकरी हळहळले

इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामावर विजयी मोहोर उमटवणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाची अठराव्या हंगामात खराब सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन्ही लढतींमध्ये राजस्थानला पराभव स्वीकारावा लागला. यामुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेमध्ये शेवटच्या स्थानावर पोहोचला असून संघाचा नेट रनरेटही -1.882 झाला आहे. बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या पराभवानंतर राजस्थानचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा फोटो पाहून नेटकरी हळहळले आहेत.

हे वाचा – IPL 2025 – ते तुझं काम होतं! ‘मुलतानचा सुलतान’ वीरेंद्र सेहवागची LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बोचरी टीका

आयपीएल 2025 ची सुरुवात होण्याआधीच राहुल द्रविड याच्या पायाला दुखापत झाली होती. पायाला प्लास्टर बांधून आणि व्हिलचेअरवर बसूनच तो राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पमध्ये दाखल झाला होता. चालताही येत नसल्याने व्हिलचेअरवर बसूनच तो खेळाडूंना मार्गदर्शन करत होता.

संजू सॅमसनही दुखापतीतून सावरला नसल्याने राजस्थानला दुहेरी धक्का बसला होता. संजूच्या जागी पहिल्या तीन लढतीमध्ये रियान पराग याच्याकडे राजस्थानचे नेतृत्व देण्यात आले. मात्र त्याला विशेष छाप सोडता आली नाही. पहिल्या दोन्ही लढतींमध्ये राजस्थानचा दारुण पराभव झाला. आधी हैदराबादने 44 धावांनी पराभूत केले, नंतर कोलकाताने 8 विकेट राखून हरवले. या दोन्ही पराभवामुळे राजस्थानचा संघ गुणतालिकेत तळाला पोहोचला आहे.

सलग दोन पराभवानंतर राजस्थानचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मैदानातील एक फोटो व्हायरल झाला. राहुल द्रविड यांच्या पायाला प्लास्टर असून हताश नजरेने ते व्हिलचेअरवर बसलेले आहेत. टीम इंडियाचा लिजेंड खेळाडूला असे पाहणे वेदनादायक असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.