
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी पहिली सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली असून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. वाल्मीक कराड याच्या गँगमधील सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिसांनी समोर गुन्ह्याची कबुली देत यामागील कारण आणि घटनाक्रमही सांगितला आहे. वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये आपला सहभाग नसल्याचा आव सुदर्शन घुले आणत होता. मात्र पोलिसांनी आवादा कंपनीच्या मॅनेजरकडे खंडणी मागतानाचा व्हिडीओ दाखवताच घुलेच्या चेहऱ्यावरील रंग उडाला आणि तो पोपटासारखा बोलू लागला. यावेळी त्याने संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुलीही दिली.
आवादा कंपनीचा पवन ऊर्जा प्रकल्प हा मस्साजोग गावात होणार असतो आणि याच कंपनीकडून खंडणी उकळण्यासाठी सुदर्शन घुले आणि इतर आरोपी कंपनीच्या कार्यालयामध्ये गेले होते. याला संतोष देशमुख यांचा विरोध होता. प्रतिक घुलेचा वाढदिवस होता त्याच दिवशी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी आम्हाला मारहाण केली. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. याचा राग आमच्या मनात होता. आवादा कंपनीकडून खंडणी उकळण्यात संतोष देशमुख यांचा अडथळा होता. त्यामुळे त्यांचा काटा काढल्याची कबुली सुदर्शन घुलेने दिली.
आम्ही 29 डिसेंबर रोजी विष्णू चाटेच्या कार्यालयामध्ये एक बैठक घेतली. त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू चाटेसोबत बैठक घेतली, अशी कबुली घुलेने दिली. तर महेश केदार याने संतोष देशमुख यांची हत्या होत असताना आपण व्हिडीओ चित्रित केल्याची कबुली दिली आहे. जयराम चाटे यानेही त्याच्यावरील आरोप मान्य केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे वाल्मीक कराड याचा पाय आणखी खोलात गेला आहे.