
कोट्यवधींचा चुना लावून दुबईला पळून गेलेल्या मौलवीच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले आहे. रियाज बंदरकर असे या भामट्या मौलवीचे नाव आहे. त्याने एक कंपनी स्थापन करून त्यात गुंतवणूक केल्यास अधिक मोबदला देण्याचे आमिष दाखवून बारा गुंतवणूकदारांना तब्बल एक कोटी 78 लाखांचा गंडा घातला होता. दरम्यान तो केरळमधील कोचिन येथे आला असून पुन्हा दुबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला जेरबंद केले.
रियाज बंदरकर हा मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील सुरुळपेठ मशिदीत मौलवी म्हणून कार्यरत होता. त्याने स्वतः तिजाराहा एंटरप्रायजेस नामक कंपनी स्थापन केली. त्याने चांगल्या परताव्याची हमी दाखवत गुंतवणूकदारांना ठेवी ठेवण्यास भाग पडले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी सुरुवातीला त्याने चांगला मोबदला दिला. त्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या ठेवी जमा केल्या असता रियाजने आपला गाशा गुंडाळत दुबई येथे पळ काढला. याप्रकरणी 3 ऑगस्ट 2024 रोजी 12 गुंतवणूकदारांनी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र रियाज दुबईला असल्याने पोलिसांना त्याच्यावर कोणतीही कारवाई करता आली नाही.
दरम्यान, तो केरळमधील कोचिनमध्ये आला असून पुन्हा दुबईला जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक नारे यांच्यासोबत पथकाने कोचिन विमानतळावरून अटक केली. त्याला अलिबाग न्यायालयाने 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
विकृताला बेड्या
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेला भररस्त्यात अडवून तिच्यासमोर अश्लील कृत्य करून पोबारा केलेल्या विकृताला सहा तासांत अटक करण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे. विजय तेलगर (34) असे अटक केलेल्या विकृताचे नाव आहे. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच महिला पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला. या विकृताने हेल्मेट घातल्यामुळे त्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र पांगे आणि त्यांच्या टीमने सीसीटीव्हीच्या मदतीने मागोवा घेत रात्री उशिरा त्याच्या मुसक्या आवळल्या.
दफन केलेला मृतदेह बाहेर काढला
आत्महत्या केलेल्या विवाहितेचा दफन केलेला मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पुन्हा बाहेर काढल्याची घटना उघडकीस आली आहे. पूनम पोकळे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून तिचे पती गणेशसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर तिचा मृतदेह घराजवळील झाडावर लटकलेला आढळला. दरम्यान सासरच्या मंडळींनी तिचा मृतदेह खाली उतरवत घाईघाईत दफनविधी पूर्ण केला. याबाबत संशय आल्याने पूनमच्या वडिलांनी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असता पोलिसांनी तिचा मृतदेह बाहेर काढून पुढील तपास सुरू केला आहे.