विदेशातून आयात होणाऱ्या कार महाग होणार; ट्रम्प प्रशासनाने फोडला टॅरिफ बॉम्ब, जगभरातील ऑटो सेक्टरमध्ये खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात ‘टॅरिफ वॉर’ सुरू केले आहे. याचाच पुढचा अध्याय बुधवारी पहायला मिळाला असून ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या सर्व वाहनांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. व्हाईट हाऊसने याबाबत एक आदेश जारी करत विदेशातून आयात होणाऱ्या वाहनांवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे जगभरातील ऑटो सेक्टरमध्ये खळबळ उडाली असून यामुळे अमेरिकेमध्ये विदेशी कारच्या किंमती वाढणार आहेत.

सत्तेत आल्यापासून डोनाल्ड ट्रम्प एका मागोमाग एक धडक निर्णय घेत आहेत. अमेरिकेतली निर्वासितांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासह त्यांनी जगभरात टॅरिफ वॉर सुरू केले. अमेरिकेच्या वस्तुंवर लावण्यात शुल्काएवढेचे शुल्क विदेशातून आयात होणाऱ्या वस्तुंवर लावण्याचा इशारा त्यांनी दिला होता. आता त्यांनी विदेशातून आयात होणाऱ्या सर्व वाहनांवर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली. हा उपाय कायमस्वरूपी असणार असून 2 एप्रिलपासून हा निर्णय लागू होईल आणि 3 एप्रिलपासून याची अंमलबजावणीही सुरू होईल, असे ट्रम्प यांनी सांगितले.

अमेरिकेत निर्मिती न झालेल्या सर्व गाड्यांवर आम्ही 25 टक्के कर आकारणार आहोत. हा कर कायमस्वरूपी असणार आहे, असे डोनाल्ड ट्रम्प ओव्हल ऑफिसमध्ये म्हणाले. या निर्णयामुळे आर्थिक विकासाला चालना मिळेल, असेही ते म्हणाले. तसेच जर कारचे उत्पादन अमेरिकेत घेणार असाल तर त्याला कोणताही कर लावणार नाही, असेही ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, यूरोपीय संघाचे प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी अमेरिकेच्या या निर्णयाची निंदा केली आहे. सर्व वाहनांवर 25 कर लावण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाबद्दल मला वाईट वाटते. मात्र आपल्या आर्थिक हितांचे रक्षण करताना चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु राहतील, असेही ते म्हणाले.

ट्रम्प यांच्या निर्णयाचा मस्क यांना फायदा?

विदेशातून आयात होणाऱ्या कारवर कर वाढवण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा एलन मस्क यांना होणार आहे. एलन मस्क टेस्ला या कंपनीचे मालक आहेत. या कंपनीच्या कारचे उत्पादन कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये होते.ट ट्रम्प प्रशासनाने देशातच बनणाऱ्या कारवर कोणताही कर आकारणार नाही हे स्पष्ट केले आहे, त्यामुळे याचा थेट फायदा टेस्लाला होईल