IPL 2025 – धावांचे तूफान धडकणार, हैदराबाद-लखनौ लढतीत आज फटकेबाजी

आपल्या पहिल्याच सामन्यात 286 धावांचा पाऊस पाडणारा सनरायझर्स हैदराबाद आता लखनौशी भिडणार आहे आणि या सामन्यातही धावांचे तुफान धडकणार असल्याचे भाकीत क्रिकेटतज्ञांनी वर्तवले आहे. दोन्ही संघांमध्ये षटकारबहाद्दर असल्यामुळे फलंदाज गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे उद्या लखनौ आपल्या गुणांचे खाते उघडतो की हैदराबाद सलग दुसऱ्या विजयाची नोंद करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदाच्या आयपीएल मोसमात सनरायझर्स हैदराबादने पहिल्याच सामन्यात 286 धावांचा डोंगर उभा केला होता. आयपीएलचा सर्वाधिक धावांचा स्वतःचाच विक्रम मोडण्यासाठी त्यांना 2 धावा कमी पडल्या, पण त्यांना आपला धावांचा विक्रमच नव्हे तर आयपीएलमध्ये सर्वप्रथम 300 पारही करायचे आहे. राजस्थानविरुद्ध इशान किशन, ट्रव्हिस हेड यांच्या घणाघाताने गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या होत्या. उद्या अभिषेक शर्माची फटकेबाजीही पाहाण्यास क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. हेन्रीक क्लासन आणि नीतेश रेड्डी यांनाही अद्याप अपेक्षित खेळ करता आलेला नाही. त्यामुळे ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौच्या संघाला हैदराबादच्या फलंदाजांचे वादळ रोखण्याचे तगडे आव्हान पेलावे लागणार आहे.

अशा परिस्थितीत लखनौला गोलंदाजी विभागात स्पष्ट नियोजनासह मैदानात उतरावे लागणार आहे, मात्र प्रमुख गोलंदाजांची दुखापतीमुळे अनुपस्थिती हे लखनौपुढचे सर्वात मोठे आव्हान असेल. गेल्या सामन्यात लखनौला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एक विकेटने पराभव पत्करावा लागला. लखनौसाठी शेवटच्या सामन्यात मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी आक्रमक फलंदाजी केली आणि अर्धशतके झळकावली. त्यामुळे उद्याच्या सामन्यातदेखील फलंदाजीची धुरा या दोघांच्या खांद्यावर असणार आहे. लखनौच्या मधल्या फळीत चांगली कामगिरी करावी लागेल. गेल्या सामन्यात लखनौच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यात लखनौने प्रभावी गोलंदाजी केली नाही तर हैदराबाद नक्कीच 200 चा टप्पा पुन्हा ओलांडणार यात तीळमात्र शंका नाही.

उभय संघांचा 12 जणांचा अंतिम संघ

सनरायझर्स हैदराबाद ः कॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, हेन्रीक क्लासन, ट्रव्हिस हेड, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सिमरजीत सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद शमी, अ‍ॅडम झम्पा.

लखनौ सुपर जायंट्स ः ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मिचेल मार्श, निकोलस पूरन, डेव्हिड मिलर, एडन मार्करम, आयुष बदोनी, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, आवेश खान, रवी बिष्णोई, दिग्विजय राठी, मनीमारन सिद्धार्थ.