
हिंदुस्थानात घुसखोरी केल्यानंतर मुंबईत येऊन नागरिकांकडून जबरदस्ती पैसे उकळणे तसेच हायवेवर देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या आठ बांगलादेशी तृतीयपंथीयांना शिवाजीनगर पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. या सर्वांची ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईवर मूळचे महाराष्ट्रीयन असलेल्या तृतीयपंथीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
गोवंडीच्या शिवाजीनगर येथील रफिक नगर परिसरात काही बांगलादेशी तृतीयपंथीय येणार असल्याची खबर शिवाजीनगर पोलिसांनी मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रांत शिंदे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून 20 ते 25 वयोगटातील आठ तृतीयपंथीय बांगलादेशींना पकडले. त्या तृतीयपंथीयांबाबत अधिकची माहिती काढली असता ते जबरदस्तीने नागरिकांकडून पैसे उकळतात. शिवाय नवी मुंबईत हायवेलगत रात्रीच्या वेळी देहविक्रीचा व्यवसाय करतात. त्यानंतर त्यातून मिळालेला पैसा ते दक्षिण मुंबईत राहणाऱ्या त्यांच्या गुरूकडे पाठवून देतात.
आश्रय देणाऱ्या गुरूवर कारवाईची आवश्यकता
शिवाजीनगर पोलिसांनी अटक केलेल्या घुसखोर बांगलादेशी तृतीयपंथीयांचा गुरू दक्षिण मुंबईत असतो. तो जरी हिंदुस्थानी असला तरी तो गुरू या बांगलादेशी तृतीयपंथीयांना आश्रय देतो. यामुळे स्थानिक तृतीयपंथीयावर अन्याय होत असल्याचे महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे बांगलादेशी तृतीयपंथीयांना आश्रय देणाऱ्या गुरूवर पोलीस व शासनाकडून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.
माहुल गाव परिसरातून नऊ बांगलादेशींना पकडले
चेंबूरच्या माहुल गाव परिसरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नऊ बांगलादेशींना आरसीएफ पोलिसांनी पकडले. याशिवाय दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलिसांनीदेखील तीन बांगलादेशींना पकडले होते. त्यात स्त्राr व पुरुषांचा समावेश आहे. आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहुल गाव परिसरात काही घुसखोर बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी माहुल गावातून नऊ बांगलादेशी नागरिकांना पकडले. त्यात स्त्राr व पुरुषांचा समावेश आहे.