विमानतळावरील शौचालयात सापडला नवजात बाळाचा मृतदेह

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील शौचालयात सफाई करण्यासाठी गेलेल्या महिलेला नवजात बाळाचा मृतदेह आढळला. या प्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला असून या बाळाला तेथे कोणी टाकले याचा शोध घेत आहेत.

मंगळवारी रात्री एक महिला कर्मचारी ही विमानतळावरील शौचालयात सफाई करण्यासाठी गेली होती. सफाई दरम्यान तिला नवजात मृत बाळ दिसून आले. तिने याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी या घटनेची माहिती सहार पोलिसांना कळवली. सहार पोलिसांनी त्या बाळाला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी त्या बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे.