कोस्टल रोडलगतची मोकळी जागा बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही, आदित्य ठाकरे यांनी ठणकावले

मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी मुंबईतील महत्त्वाच्या जागा बिल्डर-कंत्राटदार मित्रांच्या घशात घालण्याचे कारस्थान राज्य सरकारकडून सुरू आहे. आता तर कोस्टल रोडलगतच्या मोकळ्या जागाही बिल्डरला आंदण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कोस्टल रोडलगतची कुठलीही मोकळी जागा बिल्डरच्या घशात घालू देणार नाही, असे शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारला आज ठणकावले.

मिंधे-भाजप सत्ताकाळात मुंबईतील महत्त्वाच्या जागा बिल्डर, दलाल आणि कंत्राटदार मित्रांच्या घशात घालण्याचे काम सुरू असल्याचे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून सरकारचे कारस्थान उघड केले आहे.

कोस्टल रोडमध्ये निर्माण होणाऱ्या मोकळ्या जागा मिळवण्याच्या हालचाली काही बिल्डरांकडून सुरू झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे, मात्र आम्ही मुंबईकर या जागा दलालांच्या हाती लागू देणार नाही.

मुंबईतील मोकळ्या जागांवर मुंबईकरांचाच हक्क आहे. त्यामुळे या जागा महापालिकेच्याच ताब्यात असायला हव्यात. जेणेकरून मुंबईकरांसाठी या जागांचा वापर होऊ शकेल. या जागांवर मुंबईकरांसाठी मैदाने बनवता येतील, झाडे लावता येतील.