
आठवडय़ाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 728 अंकांनी घसरून 77,288 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 181 अंकांनी घसरून 23,486 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे अवघ्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे 6.40 लाख कोटी रुपये पाण्यात बुडाले आहेत.
मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ वाढीसोबत बंद झाले होते, परंतु तरीही गुंतवणूकदारांना 3.34 लाख कोटींहून अधिक नुकसान सोसावे लागले होते, तर बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एक टक्क्याची घसरण पाहायला मिळाली. यामुळे गुंतवणूकदारांना 3 लाख कोटींहून अधिक तोटा सहन करावा लागला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संभावित अमेरिकन टॅरिफमुळे गुंतवणूकदार अलर्ट झाले आहेत.