पुण्याच्या महिलेचा धावत्या एक्सप्रेसमध्ये विनयभंग, TTE विरोधात गुन्हा दाखल

धावत्या एक्सप्रेसमध्ये महिलेचा टीटीईने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. गोरखपूर-बंगळुरू ट्रेनमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून भुसावळ स्थानकात टीटीईविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पीडित महिला गोरखपूर-बंगळुरु विशेष ट्रेनने कानपूरहून पुण्याला चालली होती. महिलेने सीट आरक्षित केली होती, मात्र ती आरएसी होती. यामुळे अन्य ठिकाणी सीट उपलब्ध आहे का तपासण्यासाठी महिलेने तिवारी नामक टीटीईकडे संपर्क साधला.

टीटीईने महिलेला सुरवातीला कोच बी/4 मध्ये बसण्यास सांगितले. नंतर कोच ए/1 मध्ये 5 नंबरची सीट देण्यात आली. महिला जेव्हा कोच ए मधील तिच्या सीटवर बसली तेव्हा तिवारीही तिच्या जवळ बसला. त्याने महिलेला चुकीचा स्पर्श केला. सुरवातीला महिलेने चुकून हे घडले समजून दुर्लक्ष केले. मात्र पुन्हा तोच प्रकार घडल्याने महिला घाबरली.

घाबरेली महिला शौचालयात गेली आणि 15 ते 20 मिनिटे तिथेच राहिली. बाहेर आल्यानंतर तिवारी पुन्हा तिच्या जवळ होता. यानंतर तिने वडिलांना सर्व प्रकार सांगितला. भुसावळ रेल्वे स्थानकात महिलेने तिवारीविरोधात तक्रार दाखल केली. मनमाड पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवला.