
शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते. केवळ शिकण्याची आवड हवी. याच आवडीपोटी अनेक वृद्धांनी साक्षर होण्यासाठी चक्क परीक्षा दिली आणि निरक्षरतेचा शिक्का पुसला.
केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता अभियानाने हे साध्य केले. किमान अक्षर, संख्या ओळख व्हावी, हा यामागील उद्देश आहे. यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील 16 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये पंधरा वर्षांवरील निरक्षर सहभागी होऊ शकतात. ज्यांना वाचन, लेखन, संख्याज्ञान माहिती नाही, अशा लोकांना स्वयंसेवकाच्या माध्यमातून वर्षभर शिकवले जाते. आणि मग त्यांची रीतसर परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा काल पार पडली. यात वयोवृद्ध नवसाक्षर विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. आयुष्यभर जे लोक निरक्षर म्हणून जगले, अशांनी हा डाग पूसत साक्षरतेचा गौरव प्राप्त केला.