
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाकुंभवर लोकसभेत भाषण केलं तेव्हापासून आजपर्यंत मला सभागृहात बोलू दिले जात नाहीय. आज काहीही झालेले नसताना अध्यक्षांनी सभागृह तहकूब केलं. ही या सरकारची नवीन शक्कल आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला.
”जेव्हाही मी बोलण्यासाठी उभा राहतो मला बोलू दिले जात नाही. आज मी सभागृहात शांत बसून होतो एक शब्दही बोललो नाही. गेल्या सात आठ दिवसात मला एकदाही बोलू दिले नाही. आज मी बोलू द्यावे यासाठी विनंती केली पण ते सभागृहातून पळून गेले. हे सभागृह चालवण्याची ही पद्धत नाही. ते माझ्याबद्दल काहीतरी बोलले आणि निघून गेले”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.