जमिनीवर आपटले, अंगभर उलाथण्याचे चटके; सावत्र आजीने अमानुष हाल करून नातीला संपवले

सावत्र आजीने अमानुष हाल करून नातीला संपवल्याची संतापजनक घटना मीरा रोडमधून उघडकीस आली आहे. या क्रूर आजीने चिमुकलीला निर्दयीपणे जमिनीवर आपटून तिच्या अंगावर गरम उलथण्याने चटके दिले होते. अंगाचा थरकाप उडवणारी घटना 18 मार्च रोजी मीरा रोडमधील नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. मात्र डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान त्या चिमुकलीचा सोमवारी मृत्यू झाला.

चिमुकलीची आई अंधेरी येथे घरकाम करते. तिने विवाहबाह्य संबंधातून या मुलीला जन्म दिला होता. मात्र मुलीचा सांभाळ करण्यासाठी कोणीही नसल्यामुळे आईने तिची सावत्र आत्या वैशाली देढिया (42) हिच्याकडे तिला सांभाळण्यासाठी ठेवले होते. दरम्यान क्रूर वैशाली हिने तिच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाच्या मदतीने त्या चिमुकलीला जमिनीवर आपटले. या बेदम मारहाणीत चिमुकली बेशुद्ध झाली. ती नाटक करतेय असे समजून त्या दोघांनी तिला उलथणे गॅसवर गरम करून गालावर, छातीवर, पोटावर, दोन्ही मांड्यांवर, डाव्या गुडघ्यावर, पाठीवर चटके दिले होते. मात्र आठ दिवस मृत्यूशी झुंज देत असताना के.ई.एम. रुग्णालयात उपचारादरम्यान अखेर तिचा मृत्यू झाला