काँग्रेसच्या 12 आमदारांनी विधानसभेमध्ये काढली रात्र; हातात पोस्टर घेऊन झोपले, नेमकं प्रकरण काय?

भाजप सरकारच्या गेल्या 8 महिन्यांच्या कार्यकाळात महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या चौकशीसाठी एक समिती बनवण्याची मागणी काँग्रेस आमदारांनी ओडिशा विधानसभेत केली होती. यावेळी प्रचंड गोंधळ उडाला होता. याच गोंधळात विधानसभा अध्यक्ष सुरमा पाढी यांनी काँग्रेसच्या 12 आमदारांना 7 दिवसांसाठी निलंबित केले. यामुळे सर्व आमदारांनी निषेधाचा अजब मार्ग निवडत विधानसभेतच ठिय्या मांडला आणि रात्र विधानसभेत काढण्याचा निर्णय घेतला.

भाजपच्या 8 महिन्यांच्या कारकि‍र्दीत महिलांवर झालेल्या अत्याचाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी काँग्रेसने केली. ही मागणी मान्य न झाल्यानेर विधानसभेमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. काँग्रेस आमदार वेलमध्ये उतरले आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करू लागले. यादरम्यान विधानसभा अध्यक्षांनी आमदार रामचंद्र कदम यांच्यासह 12 आमदारांना 7 दिवसांसाठी निलंबित केले. या निर्णयानंतर काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेतच रात्र काढण्याचा निर्णय घेतला.

निलंबनाविरोधात विधानसभेमध्ये धरणे आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या 12 आमदारांना मध्यरात्री दोनच्या सुमारास बळाचा वापर करून बाहेर काढण्यात आले. यानंतर विधानसभेबाहेर काँग्रेस आमदार, नेते आणि कार्यकर्ते ठिय्या मांडून बसले. याच दरम्यान आमदार तारा प्रसाद वाहिनी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना कॅपिटल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

काँग्रेसचे निलंबित आमदार सागर चरण दास, मंगू खिल्ला, सत्यजित गोमांगो, अशोक कुमार दास, दशरथी गमांगो, सोफिया फिरदौस यांनी विधानसभेबाहेर धरणे आंदोलन सुरू केले. दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विधानसभा परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.